बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते  होणार - Balasaheb Vikhe Patil's autobiography will be published by the Prime Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते  होणार

मुरलीधर कराळे
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

विखे पाटील यांनी १९६२ पासुनच्‍या आपल्‍या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक असा दस्‍ताऐवज `देह वेचावा कारणी` या आत्‍मचरित्राच्‍या माध्‍यमातून शब्‍दबध्‍द केला आहे.

नगर : शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्‍नासंदर्भात संपुर्ण देशाला आपल्‍या विचारातून निर्णय प्रक्रीयेची प्रेरणा देणारे डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या `देह वेचावा कारणी` या आत्‍मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थाचा नामविस्‍तार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून मंगळवारी (ता. 13) सकाळी ११ वाजता होणार असल्‍याची माहिती माजीमंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

`देह वेचावा कारणी` या आत्‍मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिल्‍ली येथून करणार असून, याच कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात कोरोना संकटाच्‍या सर्व नियमावलींचे पालन करुन आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्‍यासह खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

विखे पाटील यांनी १९६२ पासुनच्‍या आपल्‍या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक असा दस्‍ताऐवज `देह वेचावा कारणी` या आत्‍मचरित्राच्‍या माध्‍यमातून शब्‍दबध्‍द केला आहे. राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या सर्वच राजकीय स्थित्‍यंतराचा आढावा तसेच वेळोवेळी घ्‍याव्‍या लागलेल्‍या राजकीय भूमिका परखडपणे मांडतानाच राज्‍यासह देशाच्‍या शेती, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाच्‍या संदर्भात तत्‍कालिन राज्‍यकर्त्‍यांच्‍या चुकलेल्‍या धोरणांवरीही मतप्रदर्शन केले असल्‍याने या आत्‍म‍चरित्राची उत्‍सुकता सर्वांनाच असल्‍याचे आमदार विखे पाटील म्‍हणाले.

या आत्‍मचरित्राचे प्रकाशन त्‍यांच्‍या हयातीतच व्‍हावे, अशी आमच्‍या कुटुंबियांची इच्‍छा होती, परंतू त्‍यांच्‍या तब्‍येतीच्‍या कारणाने ते शक्‍य झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन लोणी येथे येवून करावे, यासाठी केलेली विनंती त्‍यांनी मान्‍यही केली. एप्रिल २०२० मध्‍येच हा कार्यक्रम ठरलेलाही होता, परंतू कोवीड-१९ मुळे होवू न शकलेला कार्यक्रम आता पंतप्रधानाच्‍या हस्‍तेच १३ ऑक्‍टोबर २०२० रोजी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून होत असल्‍याचा आनंद आम्‍हाला आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण शिक्षणाचा विस्‍तार करतानच कौशल्‍य विकासाला दिलेले प्राधान्‍य महत्‍वपूर्ण आहे, या माध्‍यमातूनच संस्‍थेतील दिड लाख विद्यार्थी विविध देशांमध्‍ये वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्‍वीरीत्‍या कार्यरत आहेत. हा त्‍यांचा दुरदृष्‍टीचाच भाग होता. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या शैक्षणिक कार्याची कृतज्ञता व्यक्‍त करण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार करण्‍याचा निर्णय विश्‍वस्‍त मंडळाने घेतला असल्‍याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रते आणि शेतकऱ्यांशी या व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संवाद साधणार आहेत. जिल्‍ह्यात ही व्‍हर्च्‍युअल रॅली सर्वांना पाहाता यावी, यासाठी चौदाही तालुक्‍यात स्‍क्रीन आणि प्रोजेक्‍टरची व्‍यवस्‍था करुन सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेणार असल्‍याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख