बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात शरद पवार हेच लक्ष्य - In Balasaheb Vikhe Patil's autobiography, Sharad Pawar is the target | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात शरद पवार हेच लक्ष्य

मुरलीधर कराळे
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

शरद पवार व बाळासाहेब विखे पाटील यांचे राजकीयदृष्ट्या कधीच जमले नाही. विखे पाटील यांनी पवार यांच्या काही गुणांचा मात्र आवर्जुन उल्लेख केला आहे.

नगर : माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र `देह वेचावा कारणी` हे राजकीय वर्तुळात खळबळ माजविण्याची शक्यता आहे. विखे पाटील यांनी आपले परंपरागत राजकीय विरोधक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या आत्मचरित्रात लक्ष्य केले असून, पवार यांच्या राजकारणामुळे देशाच्या राजकीय व्यवस्थेला घातक वळण लागल्याचा आरोप त्यांनी पुस्तकात केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन काल झाले.

विखे घराण्याची राजकीय जडणघडण, सहकारी चळवळ राज्यातील सत्तांतरे, विखे घराण्याची पक्षांतरे यावर त्यांनी सविस्तर लिहिले आहे. प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत कोण अग्रभागी होते, याच्या श्रेयावरुनच शरद पवार व विखे पाटील यांच्यातील मतभेद पुढे आले आहेत. शरद पवार यांच्या `लोक माझे सांगाती` या आत्मचरित्रात देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा देखील वाटा असल्याचे म्हटले आहे. पवार यांच्या या दाव्याला बाळासाहेबांनी अक्षेप घेतला आहे. प्रवरा कारखान्याची स्थापना माझे वडील विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1950 मध्ये केली. अण्णासाहेब शिंदे हे 1955 मध्ये कारखान्याचे संचालक झाले. मग शिंदे यांचा साखर कारखान्याच्या उभारणीत काय सहभाग, असा प्रश्न विखे पाटील यांनी विचारला आहे. 

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या संबंधावरही विखे पाटील यांनी आपल्या नजरेतून प्रकाश टाकला आहे. यशवंतरावांचे स्वयंघोषित मानसपुत्र असा उल्लेख त्यांनी पवार यांच्याबाबत केला आहे. 1980 नंतर यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वजन घटले, अशी चर्चा पसरविण्यामध्ये पवार यांचाच वाटा होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पवार यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने आघाडी सरकार स्थापन केले. मात्र सत्तेसाठी काहीही करायचे, असा संदेश यातून गेला. त्यामुळे राजकीय घसरण झाली, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवार व बाळासाहेब विखे पाटील यांचे राजकीयदृष्ट्या कधीच जमले नाही. विखे पाटील यांनी पवार यांच्या काही गुणांचा मात्र आवर्जुन उल्लेख केला आहे. पवार यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची चांगली जाण आहे. मात्र त्यांच्यातील राजकारण्याने त्यांच्या गुणांवर मात केली, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख