नगर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील बंगल्यातील टेलिफोन आॅपरेटरला कोरोनाची बाधा झाली. साहजिकच थोरात यांचीही कोरोनाविषयक तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल आज आला आणि थोरात यांची या संकटातून सुटका झाली.
थोरात यांच्या मुंबई येथील बंगल्यातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याने अन्य सर्व कर्मचारी व संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये थोरात यांचीही तपासणी करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले होते. आता त्यांचा अहवाल निगेेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहेे. नगरमधील एका आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्याशी बैठक झालेल्या अधिकारी, संपर्कात आलेल्या व्यक्तीचीही तपासणी करण्यात आली होती.
संगमनेर मात्र धगधगतेच
थोरात यांचा मतदारसंघ असलेला संगमनेर तालुका मात्र कोरोनाच्या ज्वाळामध्ये धगधगत आहे. रोज तेथे रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी काही रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. जामखेड नंतर संगमनेर तालुका हाॅट स्पाॅट झाला होता. जामखेड लवकर कोरोनामुक्त होऊ शकला होता, मात्र संगमनेरची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
मंत्री थोरात रोज कोरोनाविषयक राज्याचा अहवाल घेतात. अधिकाऱ्यांना सूचना देतात. अनेकदा संगमनेरला भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतात, मात्र तरीही कोरोनाला आळा बसविण्यात यश येवू शकले नाही. आपल्या मतदारसंघासाठी विशेष वेळ काढून ते माहिती घेतात. आता थोरात यांच्या मुंबई येथील बंगल्यात कोरोनारुग्ण आढळल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.
थोरातांच्या जिल्ह्यातही वाढते रुग्ण
थोरात यांचा जिल्हा असलेला नगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या रोज किमान 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. नगर शहरातील काही भाग हाॅट स्पाॅट करण्यात आला होता. अद्यापही तोफखाना, सिद्धार्थनगर आदी परिसर हाॅट स्पाॅट आहे. शहरातील उपनगरातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बहुतेक बैठका झूम मिटिंगद्वारे होत आहेत. नगर शहरातील एका दुकानात कोरोनारुग्ण जास्त प्रमाणात आढळून आल्यानंतर बाजारपेठही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. शहराबरोबरच जिल्ह्याच्या बहुतेक बाजारपेठा सध्या बंद आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहेत.
नेत्यांकडून विशेष खबरदारी
बहुतेक नेते समाजात जात असतात. कार्यक्रम होत ऩसले, तरी गाठी-भेटी सुरूच आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते स्वतःची विशेष काळजी घेत असतात. असे असले, तरीही काही नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.

