जिल्हा बॅंकेसाठी राहुल जगताप बबनराव पाचपुतेंची मनधरणी करणार का? - Babanrao pachpute news, Will Rahul Jagtap Babanrao make Pachpute's mind for District Bank? | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेसाठी राहुल जगताप बबनराव पाचपुतेंची मनधरणी करणार का?

मुरलीधर कराळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे आज माघारीचा खेळ रंगणार आहे.

नगर : जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे आज माघारीचा खेळ रंगणार आहे.

श्रीगोंदे तालुक्‍यातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे व प्रणोती राहुल जगताप यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्यासाठी अर्ज मागे घेतले आहेत. तेथे पाचपुते समर्थकांनी अर्ज मागे घेतल्यास जगताप बिनविरोध होऊ शकतात. परंतु जगताप यांच्याकडून पाचपुते यांची कशी मनधरणी होते, ते आज दिसून येणार आहे.

यापूर्वी 21 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरीत 16 जागांपैकी आज किती जण बिनरोध होणार, हे निश्चित होणार आहे. त्यासाठी राज्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.

अहमदनगर जिल्हा बॅंक ही आशिया खंडात सहकार क्षेत्रातील एक नंबरची बॅंक आहे. तिचा नावलाैकिक या क्षेत्रात जगभर आहे. त्यामुळे आमदार, खासदार किंवा राजकीय मोठे घराणे सर्व या बॅंकेचे संचालक होण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक निवडणुकीत राजकीय खेचाखेची सुरू असते.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सुरुवातीलाच दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. सेवा संस्थांच्या मतदारसंघातून राहाता तालुक्यातून भाजपचे अण्णासाहेब म्हस्के व नेवासेमधून राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले बिनविरोध झाले. त्यानंतर पाथर्डीमधून भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतल्याने त्याही बिनविरोध झाल्या. जामखेडमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने तेथे भाजपचे जगन्नाथ राळेभात व त्यांचे पूत्र अमोल यांचेच अर्ज राहिले. त्यामुळे दोघापैकी एक आज अर्ज मागे घेतील. म्हणजे तेही बिनविरोध येतील. काल कोपरगावमधून भाजपचेच विवेक कोल्हे बिनविरोध झाले. तसेच अकोलेतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेत असल्याचे काल पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने तेही आज अर्ज मागे घेतली. म्हणजेच भाजपचेच सिताराम गायकर यांच्याही बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. असे एकूण पाच संचालक बिनविरोध होत आहेत. त्यामध्ये भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एक आहे.

पारनेरमध्ये लढत शक्य

आज पारनेर तालुक्‍यातून आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांनी अर्ज मागे घेतला. येथे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदय शेळके, भाजपचे राहुल शिंदे व शिवसेनेचे रामदास भोसले यांचे अर्ज बाकी आहेत. आमदार लंके यांनी उदय शेळके यांच्यासाठी अर्ज मागे घेतला असला, तरी तीन जणांपैकी उद्या कोण अर्ज मागे घेतात, याबाबत खलबते होणार आहेत. या मतदारसंघात आज अर्ज घेण्यावरून खेचाखेची होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीबरोबरच भाजप व शिवसेनाही रिंगणात असल्याने तेथे सामना होण्याची शक्यता आहे.

संगमनेर मतदारसंघातून रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे व दिलीप काशिनाथ वर्पे यांनी यापूर्वीच अर्ज मागे घेतला आहे. तेथे थोरात समर्थकांसाठी बिनविरोधचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख