आयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर, आमदार जगताप यांची माहिती - Ayurveda will be Kovid Center, announced by MLA Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

आयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर, आमदार जगताप यांची माहिती

मुरलीधर कराळे
सोमवार, 20 जुलै 2020

नगरमधील बुथ हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देवून रुग्णांचे मनोबल वाढविले आहे. ही सेवांची माहिती घेण्यासाठी जगताप यांनी आयुर्वेद महाविद्यालयातील डाॅक्टर्स तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना या सेवेबाबत माहिती दिली.

नगर : शहरातील गंगाधार शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात येत्या दोन दिवसांत कोव्हिड सेंटर उघडण्याचा निर्णय आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी घेतला आहे. त्या दृष्टीने आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व डाॅक्टर्स, कर्मचाऱ्यांना घेवून आमदार जगताप यांनी बुथ हाॅस्पिटलला भेट दिली आहे.

नगरमधील बुथ हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देवून रुग्णांचे मनोबल वाढविले आहे. या सेवांची माहिती घेण्यासाठी जगताप यांनी आयुर्वेद महाविद्यालयातील डाॅक्टर्स तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना या सेवेबाबत माहिती दिली. सर्वांना घेवून बुथ हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांचे मार्गदर्शन घेतले. या वेळी बुथ हाॅस्पिटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंबे यांनी सेवेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की बुध हाॅस्पिटलमधील प्रत्येक कर्मचारी अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. मनापासून कोव्हिड रुग्णांची सेवा करतात. त्यामुळे येथून गेलेला रुग्ण कधीच पुन्हा पाॅझिटिव्ह आढळलेला नाही. हे एक टीम वर्क असून, संघ भावनेतून काम केले, तरच ते यशस्वी होते. रुग्णांचा विश्वास संपादन केल्यामुळे हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नसतानाही 90 वर्षाचे ज्येष्ठ रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. आतापर्यंत सव्वासे रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे केले आहेत.

आयुर्वेद महाविद्यालयात कोव्हिड रुग्णालय शक्य

आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आहे. या संस्थेवर आमदार जगताप यांचे वर्चस्व आहे. या महाविद्यालयात कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याबाबत जगताप यांनी घोषणा केली असून, त्या दृष्टीने तेथे तयारी सुरू करण्यात येत आहे. कोव्हिड रुग्णांना तेथे उत्कृष्ठ आयुर्वेदिक उपचारही करता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हे सेंटर आगळे-वेगळे असेल, अशी भावना तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, नगर शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार होत आहेत. बुथ हाॅस्पिटलबरोबरच जिल्हा रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. रोजच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात रुग्णालयांची गरज पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेल्या आयुर्वेद काॅलेजमधील सेंटरला रुग्णांची विशेष पसंती होईल, असे नागरिकांचे मत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख