Awaiting those reports in Parner taluka | Sarkarnama

पारनेर तालुक्यात धाकधुकी ! त्या अहवालांची प्रतीक्षा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मे 2020

नऊ व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत, या आजाराचा तालुक्‍यात किती प्रसार झाला हे समजणार नाही. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेला, तसेच प्रशासनालाही आता अहवालांची प्रतीक्षा आहे. 

पारनेर : निघोज येथील रहिवासी व पिंप्री जलसेनचा जावई असलेल्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन काल (गुरुवारी) 27 आणि आज सहा, अशा एकूण 33 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी नऊ जणांचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतरच, तालुक्‍यात कोरोनाने किती पाय पसरले आहेत, हे स्पष्ट होणार आहे. 

पिंप्री जलसेनच्या जावयाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तालुक्‍यातील सर्वच यंत्रणा हादरून गेली आहे. तालुक्‍यात इतके दिवस कोरोनाने शिरकाव केला नव्हता. मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणांहून सुमारे 50 हजारांहून अधिक व्यक्ती तालुक्‍यात आल्या आहेत, तरीसुद्धा तालुका कोरोनापासून मुक्त होता. दोन दिवसांपूर्वी एकाचा या आजाराने मृत्यू झाल्यानंतर काल (बुधवारी) सायंकाळपासून पिंप्री जलसेनसह निघोज परिसर "सील' केला आहे. त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक स्तरावर पिंप्री जलसेन, निघोज, चिंचोली व पठारवाडी या गावांतील त्याच्या संपर्कात आलेल्या 33 लोकांची नावे समोर आल्याने, प्रथम त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यांतील फक्त नऊ जणांचे स्राव आज तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयातच ठेवले आहे. उर्वरित व्यक्तींना पिंप्री जलसेन येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. 

तपासणी अहवाल उद्या सकाळी येण्याची आशा आहे. या नऊ व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत, या आजाराचा तालुक्‍यात किती प्रसार झाला हे समजणार नाही. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेला, तसेच प्रशासनालाही आता अहवालांची प्रतीक्षा आहे. 

चार गावे "बंद' 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज पिंप्री जलसेन, निघोज, पठारवाडी व चिंचोली ही चार गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या क्षेत्रातील व गावांतील सर्व आस्थापना, अत्यावश्‍यक सेवेतील वस्तूंची विक्री काल बुधवारपासून (ता. 13) रविवारच्या (ता. 17) रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख