हजारे यांच्या राळेगणसिद्धीत 9 विरुद्ध 0 ने औटी-मापारी पॅनल विजयी - Auti-Mapari panel won by 9 to 0 in Hazare's Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

हजारे यांच्या राळेगणसिद्धीत 9 विरुद्ध 0 ने औटी-मापारी पॅनल विजयी

एकनाथ भालेकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४५ वर्षांत एक दोन अपवाद वगळता राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूकीची परंपरा होती. या वेळी आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांचे दोन गट प्रथमच बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्र आले होते

राळेगण सिद्धी : राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत ९ - ० ने  विजय मिळवला.

हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४५ वर्षांत एक दोन अपवाद वगळता राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूकीची परंपरा होती. या वेळी आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांचे दोन गट प्रथमच बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्र आले होते.

जिल्ह्यात सर्वात प्रथम राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. हजारे यांनीही यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. अपक्षांच्या गटांनी काही जागांवर उमेदवारी कायम ठेवल्याने फक्त २ जागा बिनविरोध होऊन ७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. प्रचार शांततेत प्रचार होऊन मतदानही शांततेत पार पडले होते.

विजयानंतर औटी व मापारी यांच्यासह समर्थकांनी पद्मवती देवीचे दर्शन घेत गुलाल उधळून जल्लोश केला. राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाचे  विजयी उमेदवार व मिळालेली मते (कंसात) पुढीलप्रमाणे : जयसिंग मापारी (विजयी, ३८५ मते)  मंगल मापारी (विजयी ४१० मते)  मंगल पठारे (विजयी ४६४ मते ), लाभेश औटी (विजयी ४०२ मते ), सुनिता गाजरे (विजयी ४६० मते), अनिल मापारी (बिनविरोध), डॉ. धनंजय पोटे (विजयी ३३३ मते), मंगल उगले (विजयी ३१६ मते), स्नेहल फटांगडे (बिनविरोध). तर किसन पठारे, विजय पोटे, विजया पठारे, उज्वला गाजरे, शंकुतला औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
 

हेही वाचा...

जागृती होण्यासाठी अण्णा हजारे कोरोना लस घेणार! 

पारनेर : कोरोनावरील लसीबाबत अनेकांच्या मनात शंका व संभ्रम आहे. त्यामुळे अनेकांना लस घ्यावी की नको, असे वाटत आहे. मात्र, मला मृत्यूची भीती वाटत नाही. मी कोरोनाची लस घेणारच, असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. 

हजारे म्हणाले, की कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील सर्वच शास्त्राज्ञांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. त्यातून कोरोनावरील लस तयार होऊन भारतात प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र, अनेकांच्या मनात लसीविषयी गैरसमज, भीती आहे. एकीकडे कोरोनाची, तर दुसरीकडे लसीची भीती, या मुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, मी लस घेणार आहे. समाजातील मान्यवर व प्रतिष्ठितांनी ही लस घेतली, तर समाजातील लसीविषयीचा संभ्रम दूर होईल. लोकांची भीती कमी होईल. कोरोना लस घेतल्यावर लोकांच्या मनातील या आजाराचीही भीती कमी होणार आहे. जनजागृती होण्यासाठी मी ही लस घेणारच असल्याचे हजारे म्हणाले. 

 

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख