`अगस्ती`त सत्तांतरासाठी आमदार लहामटे यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद - In August, MLA Lahamate took the blessings of Sharad Pawar for independence | Politics Marathi News - Sarkarnama

`अगस्ती`त सत्तांतरासाठी आमदार लहामटे यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद

शांताराम काळे
रविवार, 27 डिसेंबर 2020

आम्ही अगस्ती कारखान्यात सत्तांतर घडवू इच्छितो, तुमचे आशीर्वाद द्या. कोणत्याही आर्थिक निकषात न बसता अगस्तीला कर्ज कसे उपलब्ध झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमिततेबाबत माजी मंत्री मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. या वेळी अगस्तीत सत्तांतर घडविण्यासाठी त्यांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले.

आम्ही अगस्ती कारखान्यात सत्तांतर घडवू इच्छितो, तुमचे आशीर्वाद द्या. कोणत्याही आर्थिक निकषात न बसता अगस्तीला कर्ज कसे उपलब्ध झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार शरद पवार यांनी चर्चा करून अगोदर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, असा सल्ला दिला.

आमदार लहामटे यांच्यासोबत अशोक भांगरे, बी. जे. देशमुख, दशरथ सावंत, सुरेश गडाख, विनय सावंत, तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनीही पिचड यांच्या विरोधात तक्रारी केल्या. त्यांनी पुणे येथील साखर संकुलातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यालयात पवार यांची भेट घेऊन अगस्ती कारखान्याने दिलेल्या माहितीचे कागदपत्रे व असलेले कर्जाबाबत निवेदन दिले. 

हेही वाचा...

भाजपमध्ये प्रवेश करताना पिचड यांनी विश्वासात घेतले नव्हते : नवले

अकोले : आम्ही नेहमी डाव्या चळवळीचे पुरस्कर्ते राहिलो. कॉंग्रेस संघटन बळकट करणे, हाच एकमेव उद्देश असून, स्वगृही आल्याचा आनंद आहे. माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आम्हाला विचारात घेतले नव्हते. प्रेमापोटी आम्ही भाजपबरोबर गेलो होतो, असे प्रतिपादन अकोले तालुका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी केले. 

येथील अभिनव शिक्षण संस्थेत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, विद्यार्थी नेते मदन पथवे, रमेश जगताप, शिवाजी नेहे, आरीफ तांबोळी, विक्रम नवले उपस्थित होते. 

मधूकर नवले म्हणाले, की मुंबईत गांधी भवन येथे 22 डिसेंबरला प्रातिनिधिक स्वरूपात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आम्ही कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

मिनानाथ पांडे म्हणाले की, माझा भाजपमध्ये जाण्यास विरोध होता. परंतु, नेतृत्वाच्या मागे जावे लागले. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडले नव्हते. मात्र, पक्षात काम करताना स्थानिक नेतृत्वाने सन्मानाची वागणूक दिली नाही. बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांची ही संस्कृती नेहमी आदर्शवत राहिली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख