पोलिसांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये `माला`चीच चर्चा

बुधवारीरात्री अपर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्याकडूनही पदभार काढून घेण्यात आला. तसा आदेश गृह विभागाने काल रात्रीच काढला.
odio.png
odio.png

नगर : नगर पोलिस दलात आज एका "अर्थ'पूर्ण ऑडिओ क्‍लिपने एकच खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड व नेवाशातील गर्जे नावाच्या कर्मचाऱ्यामध्ये हा संवाद झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियातून ही "ऑडिओ क्‍लिप' मोठ्या प्रमाणात "व्हायरल' झाल्यावर हा प्रकार समोर आला. याच "ऑडिओ क्‍लिप'मुळे डॉ. राठोड यांची उचलबांगडी झाल्याचे समजते. डॉ. राठोड यांच्यासह अन्य एका अधिकाऱ्यालाही ही "ऑडिओ क्‍लिप' भोवल्याची चर्चा आहे. मात्र, "ऑडिओ क्‍लिप'च्या चौकशीनंतरच खरा प्रकार समोर येणार आहे. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच, ते कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे काही काळ ते "क्वारंटाईन' झाले. त्यांच्या गैरहजेरीत श्रीरामपूर तालुक्‍यातील गुटखा प्रकरण गाजले. पुन्हा कामावर हजर होताच, पाटील यांच्या आदेशानुसार, श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीहरी बहिरट व नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणजित डेरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली. 

दरम्यान, बुधवारी रात्री अपर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्याकडूनही पदभार काढून घेण्यात आला. तसा आदेश गृह विभागाने काल रात्रीच काढला. डॉ. राठोड व नेवाशातील गर्जे नावाच्या कर्मचाऱ्याची एक "ऑडिओ क्‍लिप' व्हायरल झाली. ती पोलिस महासंचालकांपर्यंत गेली. महासंचालकांनी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांमार्फत या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला. त्यात डॉ. राठोड यांच्यावर ठपका ठेवून त्यांची तातडीने बदली करण्यात आल्याचे बोलले जाते. 

ऑडिओ क्‍लिपमध्ये काय? 

कर्मचारी गर्जे : "साहेब, उद्या तुम्हाला भेटायला येतो. सोबत डेरे साहेबांनाही घेऊन येतो.' 
डॉ. राठोड : "माल आणता काय?' 
गर्जे : "तुम्ही फक्त आदेश द्या; सगळी सेटिंग लावून ठेवली आहे. इकडे खालचे काम माझ्याकडे असते. उद्या येऊ का? येतो, सगळी माहिती देतो.' 
डॉ. राठोड : "तिकडे रेड करायची गरज आहे का?' 
गर्जे : "नाही साहेब, तुम्ही फक्त सुरू करण्याचा आदेश द्या.' 
डॉ. राठोड : "हो ना, तिकडे चांगले मार्केट आहे. बाईने खूप कमावले का?' 
गर्जे : "अहो सर, इकडे मोठे लोक आहेत. दोन नंबर भरपूर आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचे 50 हजार रुपये आहेत. शिवाय पर्सनल कलेक्‍शन वेगळे आहे. त्यात वाळू, गुटखा, रेशनचे मोठे जाळे आहे. इकडे मोठे लोक आहेत. त्यातील एकाला उद्या भेटायला आणतो.' 
राठोड : या... 

माझी बदली करण्यासाठी ही क्लिप

"ऑडिओ क्‍लिप' माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यातील आवाज कोणाचा आहे, हेही मला माहिती नाही. केवळ माझी बदली करण्यासाठी ती "ऑडिओ क्‍लिप' पुढे आणली. मंत्री व आमदारांनी दबाव आणून माझे बदलीत नाव टाकण्यास भाग पाडले. याबाबत मी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. 
- डॉ. दत्ताराम राठोड, अपर पोलिस अधीक्षक 

चाैकशी करणार

पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर "ऑडिओ' क्‍लिप प्रकरण समोर आले. यासंदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक 
 

डॉ. राठोड यांचा पदभार काढला

अवघ्या 20 दिवसांपूर्वी डॉ. दत्ताराम राठोड यांनी अपर पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. आता गृह विभागाने त्यांच्याकडून पदभार काढून घेऊन आयपीएस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यान, डॉ. राठोड यांची कारकीर्द सुरवातीपासून वादग्रस्त ठरली. त्यांनी स्वत:चे विशेष पथक नेमून अवैध धंद्यांवर कारवाईस सुरवात केली. पोलिस दलात त्याची वेगळी चर्चा होती. गुटखा व डिझेल प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर ऑडिओ क्‍लिपमुळे त्यांचा पदभार काढून घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्या जागी चोपडा (जि. जळगाव) येथील (आयपीएस) उपविभागीय अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com