पाटेगावमध्ये दोघांवर हल्ला ; कॉंग्रेस नेत्यासह 70 जणांवर गुन्हा  - Attack on two in Pategaon; Crime against 70 people including Congress leader | Politics Marathi News - Sarkarnama

पाटेगावमध्ये दोघांवर हल्ला ; कॉंग्रेस नेत्यासह 70 जणांवर गुन्हा 

नीलेश दिवटे
शनिवार, 16 जानेवारी 2021

पाटेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून स्थापलिंग पॅनल प्रमुख प्रा. शहाजी देवकर यांच्यासह दोघांवर हल्ला प्राणघातक झाला. याप्रकरणी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कैलास शेवाळे यांच्यासह सुमारे 70 जणांवर गुन्हा दाखल झाला.

कर्जत : पाटेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून स्थापलिंग पॅनल प्रमुख प्रा. शहाजी देवकर यांच्यासह दोघांवर हल्ला प्राणघातक झाला. याप्रकरणी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कैलास शेवाळे यांच्यासह सुमारे 70 जणांवर गुन्हा दाखल झाला. मतदान झाल्यानंतर शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली. 

याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात सतीश देवकर (रा. वाघनळी, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. प्रा. देवकर यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा मारहाणीचा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तातडीने घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांची चाहूल लागताच हल्लेखोर पळून गेले. 

फिर्यादीत म्हटले आहे, की प्रा. शहाजी देवकर व इतरांनी एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना ऍड. कैलास शेवाळे व सुमारे 70 ते 80 लोकांनी येवून सतीश देवकर, प्रा. शहाजी देवकर आणि रोहित देवकर यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल चोरून नेला. याबाबत ऍड. कैलास शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

दुसऱ्या घटनेत पोलीस कर्मचारी अमित बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी बाहेरून बाउन्सर आणल्याच्या कराणावरून प्रा. शहाजी देवकर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. 

दरम्यान, मी पॅनलप्रमुख असल्याने विरोधकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र निवडणुकीच्या कामांमुळे संरक्षण देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले, त्यामुळे आपण स्वतःच्या संरक्षणार्थ माझे मित्र काही पहिलवान आणले होते, असे प्रा. शहाजी देवकर यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका शांततेत झाल्या असताना पाटेगावमध्ये त्याला गालबोट लागले आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख