Athavale's 'Go Corona' honored with 'World Record Star 2020' | Sarkarnama

आठवले यांच्या `गो कोरोना`ला `वर्ल्ड रेकॉर्ड स्टार २०२०` बहुमान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे मदतगार म्हणून ना रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.

अकोले : कोरोना या महामारीचे संकट जगावर कोसळले असताना या भयानक रोगाविरुद्ध `गो कोरोना`चा नारा देऊन लढण्याची हिम्मत देणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची लंडनच्या `वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड`ने दखल घेतली आहे. कोरोनाविरुद्ध लढणारे मानवतेचे मानवसेवेचे जागतिक दीपस्तंभ म्हणून `वर्ल्ड रेकॉर्ड स्टार २०२०` या बहुमानासाठी त्यांची निवड झाली आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नगर उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी दिली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊनच्या काळात गरिबांची मानवसेवा कोण करीत आहे, याबाबतचा सर्व्हे लंडनमधील बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे करण्यात आला. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर लॉकडाऊनच्या काळात करीत असलेल्या समाजसेवेची माहिती घेण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट सामाजिक सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड स्टार २०२० ही डिक्शनरी प्रकाशित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

लंडनला समारंभ होणार

समाजसेवा करणारे स्वयंप्रकाशित दिशादर्शक तारे म्हणून या मान्यवरांना वर्ल्ड रेकॉर्ड स्टार २०२० या बहुमानाने गौरविण्यात येणार आहे. याबाबतचा समारंभ लॉकडाऊन संपल्यानंतर नोव्हेंबर लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे भारतातील प्रमुख अँड. संतोष शुक्ला यांनी आठवले यांना दिली. 

आठवले यांनी सर्वप्रथम `गो कोरोना` चा नारा दिला. तो जगभर गाजला. संपूर्ण विश्वात लोकांनी स्विकारला. तसेच लॉक डाऊनच्या काळात त्यांनी आपल्या निवासस्थानी सतत गरिबांना भोजन देणे सुरू ठेवले असून, दिल्ली, पुणे, आसाम, मणिपूर आदी अनेक ठिकाणी आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पक्षातर्फे गरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नदान आणि अन्नधान्याची मदत केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे मदतगार म्हणून ना रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख