विधानसभा हातची गेली ! आता अकोल्यात ग्रामपंचायतींसाठी भाजपची मोर्चेबांधणी - Assembly lost! BJP's front formation for gram panchayats in Akole taluka | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा हातची गेली ! आता अकोल्यात ग्रामपंचायतींसाठी भाजपची मोर्चेबांधणी

शांताराम काळे
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

ग्रामपंचायत हा आता गावच्या विकासाचे केंद्रबिंदू बनला असून, गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे.

अकोले : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने ग्रामपंचायती लढवाव्यात. विधानसभेच्या वेळी केलेल्या चुकांमुळे अपयश आले. आता त्यातून शिकून कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असेल, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. 

भाजपा कार्यालयात आयोजित तालुका कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे होते. या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंत आभाळे, वसंत मनकर, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक विठ्ठल चासकर, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक कचरू शेटे, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत हा आता गावच्या विकासाचे केंद्रबिंदू बनला असून, गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे. यासाठी नेत्यांनी सुशिक्षित युवकांचा विचार करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा प्राधान्य द्या. बाहेरील आयात उमेदवार करू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

विधानसभेत झालेले चुकीचे मतदान आता तालुक्यातील जनता भोगीत असून, पक्ष संघटना मजबूत करावी. नवीन पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करीत पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला पिचड यांनी दिला.

भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी पक्षातील पदे ही जबाबदारी असून, भाजपा त काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. संघटनात्मक काम वाढविण्यासाठी सरचिटणीस व उपाध्यक्ष, सचिव याना जिल्हा परिषद गट, गणानुसार काम विभागणी करण्यात आली.

दरम्यान, अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आहेत. तेही ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी करतील. परंतु भाजप कार्यकर्त्यांनी भाजपकडेच जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा येतील, यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. आगामी काळात अकोले तालुक्यात भाजपचाच झेंडा फडकवायचा, असा निश्चिय या वेळी भाजप नेत्यांनी केला.

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख