Ask the culprits, not the cardinals, about the Tanpure factory | Sarkarnama

तनपुरे कारखान्याबाबत कर्डिले यांना नव्हे, वाटोळे करणाऱ्यांना जाब विचारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

तनपुरे कारखान्यास थकबाकीमुळे रिझर्व बॅंकेच्या नियमाप्रमाणे जिल्हा बॅंकेने नोटीस दिली. या कारवाईस विखे-कर्डिले वादाचे स्वरुप विरोधकांकडून देण्यात आले. त्यामुळे सभासदांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.

नगर : ``नगर जिल्हा बॅंकेने थकबाकीप्रकरणी डाॅ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्यास नोटीस बजावली. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे ती नोटीस आहे. या कारवाईला काही जणांनी मात्र वेगळाच रंग देवून आमदार शिवाजी कर्डिले यांना जबाबदार धरले आहे. परंतु इतक्या वर्षे ज्यांनी कारखान्याचे वाटोळे केले, ते सभासद विसरले आहेत का, त्यांच्याकडे पहा,`` असे आवाहन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

तनपुरे कारखान्यास थकबाकीमुळे रिझर्व बॅंकेच्या नियमाप्रमाणे जिल्हा बॅंकेने नोटीस दिली. या कारवाईस विखे-कर्डिले वादाचे स्वरुप विरोधकांकडून देण्यात आले. त्यामुळे सभासदांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. याबाबत विखे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून विरोधकांचा समाचार घेतला. 

विखे पाटील म्हणाले, की तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला. त्यांना जाब कोणी विचारायला तयार नाही. खरे तर आमदार शिवाजी कर्डिले व संचालक मंडळांनी कारखाना वाचविण्यासाठी धडपड केली आहे. त्यामुळे त्यांना दोष देणे उचित नाही. आजची दुरवस्था, थकीत कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री, इतर पूरक प्रकल्प बंद पडणे, कोणाच्या काळात झाले, याचा विसर सभासदांना पडलेला नाही. यापूर्वी कामगारांची देणी अंशतः दिली आहे. तसेच दोन वर्षे गाळपही यशस्वी झाला आहे. त्यामुळे सभासदांनी याचा अभ्यास करावा.

कर्डिले यांच्या सहकार्यामुळेच कारखाना सुरू

माजी आमदार कर्डिले यांच्या सहकार्यामुळेच कारखाना सुरू होऊ शकला. याबद्दल कोणाच्या मनात काहीही शंका नसावी. त्यामुळे त्यांना जाब विचारणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे. जिल्हा बॅंकेकडून होत असलेल्या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरुप देऊ नये. कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डिले दोघेही आगामी काळात प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेवू नये, असे आवाहन खासदार विखे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्डिले यांचा पराभव झाल्यानंतर त्याला विखे पाटील जबाबदार असल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर काहींनी हे राजकारण तनपुरे कारखान्यातही आणले. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून विखे पाटील तनपुरे कारखान्याला त्रास देत असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. कारखान्याच्या दुरवस्थेला विखे-कर्डिले यांच्या वादाचे कारण काहींनी पुढे केल्याने आज अखेर खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन आपले मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये कर्डिलेे यांचे अप्रत्यक्ष काैतुक करून कारखान्याच्या दुरवस्थेला ते जबाबदार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख