तूर्त राजकारण बाजुला, काॅंग्रेसचा हा नेता जुंपला कोरोनाच्या प्रबोधनाला - Aside from politics, this Congress leader jumped on the corona | Politics Marathi News - Sarkarnama

तूर्त राजकारण बाजुला, काॅंग्रेसचा हा नेता जुंपला कोरोनाच्या प्रबोधनाला

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

पक्षाची मोठी जबाबदारी असली, तरी सध्या राजकारण बाजुला ठेऊन कोरोनाच्या कामात स्वतःला वाहून घेतले आहे. लोक फोन करतात. अनेकजण अडचणी मांडतात. त्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना मदत करणे अत्यंत आवश्यक आहे.

नगर : कोरोनामुळे लोक भयभीत झाले असताना त्यांना आधार देणे गरजेचे आहे. कोरोनाविषयक अफवांना लोकांनी बळी पडू नये, लोकांनी मनाने पाॅझिटिव्ह रहावे, यासाठी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख सध्या प्रबोधन करीत आहेत. आपल्या विकासवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून ते रोज व्हिडिओ तयार करणे, सोशल मीडियावर माहिती टाकणे, तज्ज्ञांच्या मुलाखती लोकांपर्यंत पोहचवित आहेत. राजकारण बाजुला ठेऊन समाजासाठी त्यांचा उपक्रम जिल्ह्यात काैतुकाचा ठरत आहे.

नगर शहरातील सोशल मीडियावर सध्या कोरोनाविषयक जनजागृतीच्या पोस्ट फिरत आहेत. देशमुख स्वतः त्यांच्या कार्यालयात येऊन रोज नवीन व्हिडिओ तयार करीत आहेत. त्यामध्ये कोरोनाविषयक शंकांचे निरसन केले जात आहे. यापूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांच्या, तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मुलाखती घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याद्वारे मिळवून दिले. शहरात कोणत्या रुग्णालयात कोरोनाचे बेड शिल्लक आहे, ही माहिती सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संबंधित वेबसाईटची लिंक ते रोज शेअर करताना दिसतात. कोरोनाच्या काळात मनोधैर्य राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही प्रोत्साहित करणाऱ्या कविता, कोरोनासोबत जगायचे कसे, किरकोळ आजार झाला, तरी लोक घाबरून जातात, त्यातील वस्तुस्थिती आदींबाबतची माहिती रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाठवित आहेत. 

कोरोनाच्या काळात रुग्णांनी प्राणायाम, योगप्राणविद्याचे फायदे, कोणते काढे घ्यावेत याची माहिती ते देतात. तसेच कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्यांचे अनुभवही ते शेअर करून लोकांच्या मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी अनेक व्हिडिओ शेअर करून प्रबोधन केले आहे.

तूर्त राजकारण बाजुला

पक्षाची मोठी जबाबदारी असली, तरी सध्या राजकारण बाजुला ठेऊन कोरोनाच्या कामात स्वतःला वाहून घेतले आहे. लोक फोन करतात. अनेकजण अडचणी मांडतात. त्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यात नगरमधील अनेक लोक सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख