जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिण्यांपासून जामखेड येथील डॉ. शोभा आरोळे व रवी आरोळे संचलित ग्रामीण आरोग्य प्रकल्प सर्वांसाठी आधारवड ठरत आहे.
पन्नास वर्षांपूर्वी रॅमन मेगसेस पुरस्कार विजेते डॉ. मेबल आरोळे आणि डॉ. रजनिकांत आरोळे या दामपत्यांनी पेटवलेला आरोग्य सेवेचा नंदादीप त्यांच्या मुलांनी अखंड तेवत ठेवला. यानिमित्ताने जामखेडकरांना या दोन्ही डाॅक्टरांची आठवण पुन्हा पदोपदी होत असून, `दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती`, असे चित्र पहायला मिळते आहे.
क्वारंटाईन झालेले लोक घाबरलेले असतात. स्त्राव तपासणीचा अहवाल काय येईल, या तणावात ते असतात. अशा स्थितीत ज्या रुग्णालयात ठेवले, तेथील डॉक्टरांनी धीर दिला तर ते डॉक्टर आपलेसे वाटतात. अशा हजारो क्वारंटाईन लोकांचे गेल्या पाच महिन्यांपासून आधार ठरले जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालक डॉ. शोभा आरोळे व रवी आरोळे हे बहिण-भाऊ.
जगभर कोविड - 19 ची सुरुवात होत असताना पुढील शक्यता व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोळे बहीणभावंडांनी जामखेड येथे स्वतःहून ग्रामीण भागातील लोकांना क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध होण्याची दृष्टीने कोविड -19 क्वारंटाईन सेंटर तयार करून ठेवले. याचाच उपयोग पुढील काळात मोठ्या प्रमाणावर लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी झाला.
क्वारंटाईन सेंटर म्हटले की, जबरदस्तीने डांबून ठेवले जाईल की काय, अशी भीती सुरवातीला लोकांच्या मनात होती. ही गैरसमजूत दुर करुन क्वारंटाईन सेंटर ही संसर्ग वाढू नये म्हणुन कोरोना संशयीत व्यक्तिंना डाॅक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्याची व्यवस्था आहे. हे लोकांच्या मनावर या भावंडांनी रुजवले. क्वारंटाईन असलेल्या लोकांना औषधोपचारासोबतच त्यांचे मनोधैर्य उंचावणे, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आरोग्यवर्धक आहार देणे व इतर उपचार येथे सुरू आहेत. सुरूवातीला क्वारंटाईन सेंटर म्हणुन सूरू केलेल्या या सेंटरचे रूपांतर कोविड-19 पाॅझिटिव्ह पेशंट ट्रिटमेंट सेंटरमधे झाले. गेले काही दिवसांपासून अनेक कोरोना रुग्ण येथे यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत. या सर्व कामात प्रकल्पातील सहकाऱ्यांचेही मोठे योगदान आहे.
Edited By - Murlidhar Karale

