With the approval of the police training center, the economy of Jamkhed will change | Sarkarnama

पोलिस प्रशिक्षण केंद्रास मंजुरी मिळाल्याने जामखेडचे अर्थकारण बदलणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 जून 2020

जामखेड येथे रोजगारासाठी तरुणांना भटकंती करावी लागते. आता पोलिस प्रशिक्षण केंद्रास मंजुरी मिळाल्यामुळे तालुक्याचे भाग्य उजाळणार आहे.

नगर : जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 हे प्रशिक्षण केंद्र मंजुर झाल्यामुळे या गावाचे नाव आता कायम राज्यात झळकणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सुरू झालेल्या या केंद्रामुळे जामखेड तालुक्याचे अर्थकारण बदलणार आहे.

जामखेड व कर्जत ही दोन्ही तालुके दुष्काळी पट्ट्यातील ओळखली जातात. बिड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जामखेड येथे रोजगारासाठी तरुणांना भटकंती करावी लागते. आता पोलिस प्रशिक्षण केंद्रास मंजुरी मिळाल्यामुळे तालुक्याचे भाग्य उजाळणार आहे. कारण तेथे सुमारे अकराशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची निवासाची व्यवस्था होऊ शकणार आहे. शिवाय राज्यभरातून येथे लोकांची ये-जा होणार असल्याने तालुक्याचे अर्थकारण बदलणार आहे. शेतीमालालाही चांगली मागणी वाढून भाजीपाला, दुग्ध व्यवसाय, जीवनावश्यक वस्तू आदींबाबत कायमस्वरुपी मागणी वाढणार आहे. 

जामखेड तालुक्यात दोन वर्षांपूर्वीच या केंद्राला गृह विभागाची मंजुरी मिळाली होती, तथापि, सरकारने ते जळगाव येथे हलविले होते. त्यामुळे महत्त्वाची योजना इतर जिल्ह्यात गेली होती. याचा आमदार पवार यांनी अभ्यास करून त्यासाठी पुन्हा पाठपुरावा केला व हे केंद्र पुन्हा खेचून आणले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. शेजारी असलेले बीड व उस्मानाबाद जिल्हालाही या केंद्राचा चांगला फायदा होणार आहे.

कर्जतची आैद्योगिक वसाहतीला बळ

कर्जत येथील आैद्योगिक वसाहतीच्या मंजुरीसह येथे जास्तीत जास्त उद्योग यावेत, यासाठी आमदार पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात तालुक्यात अनेक उद्योग आल्याने युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. कंपन्यांमुळे परिसरातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलते. रोजगारासाठी मजुरांचा मोठा वर्ग परिसरात राहतो. त्यामुळे स्थानिक व्यवसाय भरभराटीस येणार आहेत. 

दरम्यान, जामखेड व कर्जत हे दोन्ही तालुके नगरच्या दक्षिण भागातील आहेत. येथे कुकडीचे पाणी पुरेसे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींचे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्जत तालुक्यात आैद्योगिक वसाहत व जामखेड येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु होत असल्याने परिसराला नवसंजीवनी मिळणार आहे. यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून अशा पद्धतीने विकास होत नव्हता. आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आमदार असल्याने व हा पक्ष सत्तेत असल्याने दोन्हीही तालुक्यांच्या कामांना निधी कमी पडणार नाही, अशी आशा नागरिकांना आहे. त्यामुळे लोकप्रतिनीधींकडून लोकांच्या आशा वाढल्या आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख