श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे काँग्रेसचा चेहरा - Anuradha Nagwade is the face of Congress in Shrigonda | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे काँग्रेसचा चेहरा

संजय आ. काटे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

काँग्रेस पक्षाची धुरा अनेक वर्षे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता सांभाळणाऱ्या शिवाजीराव नागवडे यांच्या कुटूंब व गटाच्या पाठीशी पाठीशी मंत्री थोरात राहिले आहेत.

श्रीगोंदे : विधानसभा निवडणूकीत विखुरलेल्या काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या ताकतीने बांधणी सुरु झाली आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली. त्यातच राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने नागवडे यांना मानणारे कार्यकर्ते सैरभैर दिसत होते. मात्र जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे यांचा चेहरा तालुक्यात काँग्रेस पक्ष म्हणून पुढे येत असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दौऱ्यानंतर त्याला पुष्ठी मिळत आहे. 'बापुं'च्या वारसदार म्हणून अनुराधा नागवडे यांचे राजकीय लाँचिंग होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाची धुरा अनेक वर्षे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता सांभाळणाऱ्या शिवाजीराव नागवडे यांच्या कुटूंब व गटाच्या पाठीशी पाठीशी मंत्री थोरात राहिले आहेत. मंध्यतरी राजेंद्र नागवडे यांनी पक्षबदल केला व ते विखे कुटूंबाच्या जवळ गेले तरी थोरात यांनी त्यांच्यावर वक्रदृष्टी केली नाही. अनुराधा नागवडे या पक्षाचे प्रदेश पातळीवरील पद सांभाळत असून, जिल्हा परिषदेत त्या थोरात गटाच्याच आहेत. त्यामुळे थोरातांची कृपादृष्टी नागवडे यांच्यावर कायम राहिली. याचाच प्रत्यय दोन दिवसांपुर्वी शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळा अनावर प्रसंगी आला.

राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांनी अप्रत्यक्ष नाराजी जाहीर केली, मात्र बापुंनंतर नागवडे कुटुंबावर त्यांचे लक्ष्य  कायमच असल्याचे दिसून आले. बापु व थोरात कुटुंबांचे असणारे घट्टे नाते आता भविष्यातही नागवडे व काँग्रेसला उपयोगी ठरणार आहे.

तालुक्यात नागवडे यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसची सैल झालेली घडी बसविण्यासाठी आता अनुराधा नागवडे यांना सांगण्यात आल्याचे समजते. त्यांचाच चेहरा भविष्यात पक्ष वापरणार असून विधानसभा व इतर निवडणूका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील अशी रणनिती ठरल्याचे समजते.

तालुक्यात आजच्या घडीला राजकीय संभ्रमावस्था असली तरी नागवडे यांचाच गट सगळ्यात प्रबळ दिसतो. आमदार बबनराव पाचपुते यांचे आचारपण त्यांना लोकसंपर्कापासून दूर ठेवत आहेत. त्यातच राज्यात सत्ता नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुत्र घनशाम शेलार यांनी घेतले असून ते लोकांशी संपर्क ठेवून आहेत. माजी आमदार राहूल जगताप कुकडी कारखान्यात व्यस्त असल्याने त्यांचा पक्षीय संपर्क कमी झाला असल्याचे दिसते. या सगळ्या गोंधळातही नागवडे यांना मानणारे कार्यकर्ते जागीच व ठाम असल्याचे चित्र आहे. बापुंनी प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते घडविल्याने त्यांच्यासह त्यांचे कुटूंब आजही नागवडे कुटूंबासोबत राहिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीपुर्वी नागवडे कारखाना व तालुक्यातील ५९ ग्रामंपचायती निवडणूका होणार आहेत. त्यांच्यासाठी अनुराधा नागवडे यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. त्यातच थोरात यांच्या दौऱ्यानंतर आता नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याने भविष्यात तालुक्यात काँग्रेस नव्या दमाने मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख