नगर : कोरोनाविषयक अँटीजेन चाचण्या करण्यास नगरमध्ये सुरूवात केली असून, त्यामुळे कोरोनाचा अहवाल जलदगतीने येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत या चाचण्या सुरू झाल्या असून, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. आतापर्यंत घेतलेल्या 1095 चाचण्यांमध्ये 158 रुग्ण बाधित आढळले. तसेच नगरच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 10, खासगी प्रयोगशाळेत 173 बाधित आढळले. त्यामुळे आज दिवसभरात 341 नवे रुग्ण वाढले आहेत.
अँटीजेन चाचण्यांचा तीन-चार दिवसांचा एकत्रित अहवाल आल्यामुळे हा आकडा एकदम वाढला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण 2027 बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. सध्या 854 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1133 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांच्या जवळील व्यक्तींची जलदगतीने तपासणी व्हावी, यासाठी जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना मागील तीन-चार दिवसांत प्रारंभ केला. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येते. या प्रक्रीयेचा वेग वाढावा, यासाठी प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून पाॅझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची आजच्या रुग्णसंख्येत भर पडली आहे. सध्या रोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून, ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनातून चिंता व्यक्त होत आहे.
कर्जतमध्ये बुधवारपासून कर्फ्यू
वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी बुधवारपासून कर्जतमध्ये जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय आज आमदार रोहित पवार यांनी जाहीर केला. याबाबत आज पवार यांनी अधिकारी, पदाधिकारी व व्यापाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव तसेच सर्व विभागातील अधिकारी, राजकीय पदाधिकारी, उपस्थित होते.
कर्जतमध्ये पाच कोरोना रुग्ण आढळले असून, आज एका वृद्धाचे निधन झाले. त्यामुळे कर्जत शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेवून निर्णय घेण्यात आले. कर्जतला रुग्ण वाढू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यावर सर्वांनी तयारी केली असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी पवार यांनी केले. नागरिकांनी सहकार्य न केल्यास जामखेडसारखी परिस्थिती होऊ शकेल. त्यामुळे रुग्ण वाढण्याच्या आधीच उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

