राळेगण सिद्धी : नगरचे नुतन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यात सुमारे एक तास झालेल्या चर्चेत हजारे यांनी आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रशासनात चांगले काम केले, तर जिल्हा, राज्य व देशात विधायक परिवर्तन करण्याची ताकद असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी म्हणून राजेंद्र भोसले यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्विकारला. रविवारी पुण्याहून नगरला येताना जिल्हाधिकारी भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे सायंकाळी हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूर व इतर ठिकाणी केलेल्या कामकाजाची माहिती हजारे यांना दिली. तसचे नगर जिल्ह्यात काम करताना आपले आशीर्वाद व मार्गदर्शन मिळावे, ही विनंती केली.
या वेळी हजारे यांनी राळेगणसिद्धीतील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील माथा ते पायथा, बंधाऱ्यात प्लॅास्टिक कागद अस्तरीकरण प्रयोगातील यशस्वीतेची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांना दिली. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका घेऊन चांगले काम केले, तर तर जिल्हा, राज्य व देशात परिवर्तन करण्याची ताकद आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी नगर जिल्ह्यात चांगले काम करावे, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.
हजारे यांच्या लोकपाल, माहिती अधिकार आंदोलनातील अनेक घटनाक्रम व चांगल्या गोष्टी आपण नेहमी पाहत असायचो, अशी आठवण जिल्हाधिकारी भोसले यांनी या वेळी चर्चेत काढली. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हजारे यांच्या विषयी अनेक घटनांचा अभ्यास झाला. हजारे यांनी क अनेक आंदोलनाचा अभ्या झाला असल्याचे डाॅ. भोसले यांनी सांगितले.
या वेळी तहसिलदार ज्योती देवरे, नायब तहसिलदार रावसाहेब रणदिवे, पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, तलाठी अशोक डोळस, शिवाजी शिंदे, सचिन पोटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात नव्याने आलेले सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हजारे यांचे आशीर्वाद घेतात. डाॅ. भोसले यांनीही भेट देऊन हजारे यांच्या कामाविषयी माहिती जाणून घेतली. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार ही आदर्श गावे या जिल्ह्यात आहेत. प्रत्येक नवीन अधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन माहिती घेतली आहे. आता नव्याने आलेले डाॅ. भोसले यांनीही हजार यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी सांगितलेल्या काही आदर्श धडे घेऊन जिल्हाधिकारी परतले.
Edited By - Murlidhar Karale

