ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती पद्धतीबाबत अण्णा हजारे यांची नाराजी - Anna Hazare's displeasure over appointment of administrators on Gram Panchayats | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती पद्धतीबाबत अण्णा हजारे यांची नाराजी

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 16 जुलै 2020

राज्यात सुमारे 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या मुदती या वर्षाअखेरीस म्हणजे डिंसेबर अखेर संपत आहेत. या सर्वच ग्रामपंचातीवर प्रशासकाच्या नियुक्त्या होणार आहेत.

पारनेर : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक येणार आहे व त्या प्रशासकाची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार आहे. याचा अर्थ ग्रामपंचायतीवर नव्याने नियुक्त होणारा प्रशासक हा फक्त राजकिय वजनदार असावा लागेल. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

असे असले, तरी संबंधित परिपत्रकाचा अभ्यास करून नंतरच ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कोरोनामुळे निवडणुका घेता येत नसल्याने आता राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकराज येणार आहे. राज्यात सुमारे 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या मुदती या वर्षाअखेरीस म्हणजे डिंसेबर अखेर संपत आहेत. या सर्वच ग्रामपंचातीवर प्रशासकाच्या नियुक्त्या होणार आहेत. मात्र ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल त्या वेळी तेथे प्रशासक येणार आहे व तेथे निवडणूक होताच त्या प्रशासकाची मुदत तात्काळ संपणार आहे. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी पालमंत्र्यांची शिफारस लागणार आहे. याचा अर्थ पालकमंत्री किंवा त्या तालुक्यातील आमदार सुचवतील त्यांची वर्णी प्रशासक म्हणून लागणार आहे. ज्या आमदारांचे वर्चस्व आहे, त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी सरपंचपदी लागणार आहे. मात्र त्यासाठी काही शैक्षणिक पात्रता किंवा संबधीत व्यक्तीचा ग्रामपंचायतीचा कारभार पाहाण्याची कुवत किंवा अनुभव विचारात घेतला जाईल, याची मात्र खात्री नाही. त्यामुळे या पुढील काळात प्रशासक नियुक्तीनंतर गावागावात वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत हजारे यांना नाराजी व्यक्त केल्याने ते आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे. कारण याबाबत परिपत्रक पाहिल्यानंतरच आपण भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ आगामी काळात या निवडीबाबत ते राज्य सरकारला काही सूचना करू शकतात. सरपंचपद हे कोणत्याही राजकीय हातातले खेळणे बनू नये, अशी भूमिका हजारे यांनी पूर्वीपासून घेतली आहे. त्यामुळे या पदावर विराजमान होणारा प्रशासक हा कोणत्याही पक्षाकडे झुकलेला नसावा, अशी अपेक्षा हजारे यांनी आहे. प्रत्यक्षात मात्र ही निवड पालकमंत्री करणार असल्याने पालकमंत्र्यांच्याच मर्जीतील सरपंच होणार आहे. त्यामुळे हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख