Anna Hazare's birthday tree planting and blood donation message | Sarkarnama

वाढदिवसानिमित्ताने अण्णा हजारे यांचा वृक्षारोपण व रक्तदानाचा संदेश

मार्तंड बुचुडे
सोमवार, 15 जून 2020

सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावात आल्यावर स्वतःचा प्रपंच न करता गावाचा प्रपंच हाती घेतला. गावातूनच कामाची सुरवात केली.

पारनेर : प्रत्येकाने आपल्या घरी किंवा परिसरात कोरोनासंबंधी सोशल डिस्टंन्सचे नियम पाळून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर किंवा गरीबांना शक्य ती मदत करून साध्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करावा. मला सोशल मीडियावरच शुभेच्छा द्याव्यात. राळेगणसिद्धी येथे येऊन गर्दी करू नये, कोणीही प्रत्यक्ष भेटीचा आग्रह करू नये, असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने केले आहे.

सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी सर्वांच्याच सुरक्षततेसाठी कार्यकर्त्यांना भेटण्यास मनाई केली आहे. माहिती अधिकाराचे प्रणेते, लोकपाल व लोकायुक्त कायदा , ग्रामसेभेला जादा अधिकार, सरपंचाला माघारी बोलविण्याचा अधिकार, दप्तर दिरंगाई, वनरॅंक वन पेन्शन, मत पत्रीकेवर उमेद्वाराचा फोटो आदींसह अऩेक कायदे सरकारला करण्यास भाग पाडणाऱ्या व अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी, या उक्तीत तंतोतंत बसणाऱ्या हजारे यांचा आज 83 वाढदिवस आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांना लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली, त्याचप्रमाणे प्रती गांधी म्हणून अनेक मान्यवरांनी हजारे यांना सुद्धा संबोधले आहे.

हजारे यांनी वरील कायदे करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने व उपोषणे केली आहेत. हजारे यांच्या उपोषणाची सुरूवात नगर येथून जिल्हापरीषद कार्यालयासमोर बसून गावातील शाळेला मान्यता मिळावी, यासाठी झालेली आहे. त्यानंतर पुढे सातत्याने जनहितासाठी त्यांनी आंदोलने व उपोषणे केली. त्यात राळेगणसिद्धीसह आळंदी, मुंबई व थेट दिल्ली येथेही अनेक आंदोलने व उपोषणे झाली. सरकारच्या विरोधात लढताना काही वेळा त्यांना अटकही झाली. त्यांनी समाजासाठी विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी सुमारे 145 दिवस उपोषणे केली आहेत.

सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावात आल्यावर स्वतःचा प्रपंच न करता गावाचा प्रपंच हाती घेतला. गावातूनच कामाची सुरवात केली. `पाणी आडवा व पाणी जीरवा` ही संकल्पना राबवून जलसंधारणाची कामे प्रत्यक्षात राबवून ती संकल्पना थेट राज्यात राबवावी लागली. आज देशातच नव्हे, तर परदेशातही हजारे यांची ख्याती आहे. तरीही हजारे यांचे पाय अद्यापही जमिनीवरच आहेत.

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाले आणि हजारे यांनीही जनतेला आपला चांगला संदेश जावा व सरकारचे आदेश आपण व जनतेने पाळावेत, या उद्धेशाने स्वतःच भेटीगाठी दौरे बंद केले. इतकेच नव्हे, तर कार्यालयातील कामगारांना सुद्धा घरी थांबण्याचे आदेश दिले. बाहेरील कार्यकर्त्यांबरोबरच गावातील लोकांनाही भेटण्यासाठी प्रतिबंध केला. या काळात हजारे यांनी सकाळी नियमित व्यायाम योगासने सुरू ठेवली आहेत. पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण लक्षात घेता स्वतः बंदोबस्तही जिल्हा पोलीस अधीक्षक व गृहमंत्र्यांना कळवून कमी करून घेतला आहे.

हजारे सध्या दैनंदिन दिवसभर ज्ञानेश्वरी भगवतगीता आदी ग्रथांचे वाचन करत आहेत. त्याच बरोबर ते काही महत्वाच्या गोष्टीवर लिखन सुद्धा करत आहेत. जनतेने देशाच्या व राज्याच्या हितासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असा संदेशही हजारे यांनी जनतेला दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख