अण्णा हजारे यांनी मौन वा धरणे आंदोलन करावे, राळेगणसिद्धी परिवाराची मागणी - Anna Hazare should hold silent or dam agitation, demand of Ralegan Siddhi family | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा हजारे यांनी मौन वा धरणे आंदोलन करावे, राळेगणसिद्धी परिवाराची मागणी

एकनाथ भालेकर
रविवार, 24 जानेवारी 2021

स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालास हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी, यांसह इतर मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून अखेरचे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सध्या अण्णांचे वय 83 वर्षे आहे. या वयात अण्णांनी उपोषणाऐवजी मौन वा धरणे आंदोलन करावे, अशा भावना राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) होणाऱ्या ग्रामसभेत राळेगणसिद्धी परिवारातर्फे अण्णांना तशी विनंती केली जाणार आहे. 

स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालास हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी, यांसह इतर मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेऊन केलेली शिष्टाई निष्फळ ठरली. उपोषणाची तारीख जवळ येऊ लागल्याने राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ व हजारे यांच्या चाहते चिंतेत पडले आहेत. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिद्दी स्वभाव असलेले हजारे जिवाची बाजी लावायला मागे हटणार नाहीत. मात्र, या वयात उपोषण केल्यास त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यावर परिणाम होण्याचा धोका असल्याचे येथील नागरिक डॉ. दौलत पोटे, डॉ. रामदास पोटे, डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले. मात्र, हजारे यांना उपोषणापासून कसे परावृत्त करणार, हा प्रश्न ग्रामस्थ व त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यासाठी प्रजासत्ताकदिनी सायंकाळी येथील संत यादवबाबा मंदिरात ग्रामसभा घेऊन अण्णांनी उपोषणाऐवजी मौन किंवा धरणे आंदोलन करण्याचा ठराव करण्यात येणार आहे. अण्णांनी उपोषण करू नये, अशी विनंती राळेगणसिद्धी परिवारातर्फे केली जाणार असल्याचे माजी सरंपच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, भागवत पठारे, सुनील हजारे, दत्ता आवारी, शरद मापारी यांनी सांगितले. तसेच हजारे यांच्या मागण्या रास्त असल्याने केंद्र सरकारने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

हे उपोषण धोकादायक

अण्णा हजारे यांनी उपोषण केल्यास त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशनमुळे) व ग्लुकोजचे प्रमाण कमी होऊ शकेल. या वयात त्याचा गंभीर परिणाम रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, किडनी, मूत्रसंस्था या अवयांवर होईल. त्यांच्या शरीर स्वास्थ्यासाठी हे अतिशय धोकायदायक ठरू शकेल. 
- डॉ. हेमंत पालवे, अण्णा हजारे यांचे खासगी डॉक्‍टर 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख