राळेगण सिद्धीच्या विकासाचे अण्णा हजारे यांनी सांगितले रहस्य - Anna Hazare shared the secret of the development of Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राळेगण सिद्धीच्या विकासाचे अण्णा हजारे यांनी सांगितले रहस्य

एकनाथ भालेकर
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

दिवसेंदिवस खेडी ओस पडत चालली असून, शहरे फुगत चालली आहेत. कारण आम्ही गांधीजींचे ऐकले नाही.

राळेगण सिद्धी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राळेगण सिद्धीचा विकास झाला. कोणाचीही देणगी न घेता गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम सुरु केले, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हजारे यांनी गांधीजींच्या स्मृतींना उजाळा दिला. गांधीजींचे विचार आपल्या जीवनात कसे प्रेरक ठरले. तसेच त्यांचे विचार जीवनात आमलात आणल्यामुळे कोणते बदल झाले अशा विविध विषयांना त्यांनी स्पर्श केला. आजच्या काळात तरुणांनी त्यांचे विचार आचार, कार्य व संदेश आचरणात आणण्याची गरज आहे.

पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामुळे आज गाव स्वयंपूर्ण झाले आहे. गेल्या चौदा वर्षात १३ लाख लोकांनी ग्रामविकासाचे काम पाहण्यासाठी भेट दिली, गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने अंमलात आणला असता, तर आज देशावर ही वेळ आली नसती. कोरोना संकटामुळे शहरातील लोंढेच्या लोंढे गावाकडे येत असून, त्यासाठी खेडी स्वयंपूर्ण होणे महत्वाचे वाटते, असे हजारे म्हणाले. 

दिवसेंदिवस खेडी ओस पडत चालली असून, शहरे फुगत चालली आहेत. कारण आम्ही गांधीजींचे ऐकले नाही. गांधीजीनी सांगितले होते, की खेड्याकडे चला, खेडी विकसित झाली की देश आपोआप विकसित होईल. आज देशाला गांधीजींच्या विचारांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, की सध्या विकासाच्या नावाखाली पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे कार्बनडायऑक्साईड सारखा विषारी वायू बाहेर पडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणामुळे वेगवेगळे आजारही वाढत आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढून हिमालयासारख्या पर्वताच्या बर्फाचे पाण्यात रुपांतर होऊन ते समुद्राला मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या व समुद्रालगत असणाऱ्या शहरांना धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासात प्रकृती व मानवतेचे शोषण नको आहे, कारण असा विकास शाश्व्त नसतो त्याचा कधीतरी विनाश होणार असल्याचेही हजारे यांनी सांगितले. 
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख