अण्णा हजारे रोज वाचतात ज्ञानेश्वरी अन भगवदगीता - Anna Hazare reads Dnyaneshwari and Bhagavad Gita every day | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा हजारे रोज वाचतात ज्ञानेश्वरी अन भगवदगीता

मुरलीधर कराळे
सोमवार, 15 जून 2020

अण्णा हजारे रोज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उठतात. उठल्यानंतर फिरणे, योगासने, प्राणायाम हे व्यायाम सुमारे एक तासभर सुरू असते. सहा ते दहाच्या दरम्यान स्नान, पूजा करून त्यांचा नाश्ता होतो.

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या रोज ज्ञानेश्वरी आणि भगवदगीता वाचतात. त्यातील श्लोक व ओव्यांचे अर्थ समजावून घेत त्याचा अभ्यास करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहेरील भेटी-गाठी पूर्ण बंद केल्या आहेत. गावातील लोकांनाही ते भेटत नाहीत.

अण्णा हजारे रोज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उठतात. उठल्यानंतर फिरणे, योगासने, प्राणायाम हे व्यायाम सुमारे एक तासभर सुरू असते. सहा ते दहाच्या दरम्यान स्नान, पूजा करून त्यांचा नाश्ता होतो. नंतर टिव्ही पाहून देशभरातील, राज्यभरातील घडामोडीचे अवलोकन करतात. सकाळी 11 च्या दरम्यान ज्ञानेश्वरी, भगवदगीता वाचन करतात. दुपारी गावातील सरपंच किंवा महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीला लांबून बोलतात. त्यानंतर जेवण करून दुपारी आराम करतात. संध्याकाळी चिंतन, मनन, ट्रेनिंग सेंटरमध्ये फेरफटका मारणे, लिखान अशी त्यांची दीनचर्या असते.

हजारे यांचा आज वाढदिवस आहे. सध्या कोरोनाची स्थिती राज्यभर असल्याने त्यांच्या लोकांशी गाठी-भेटी पूर्ण बंद आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम, लेखन, वाचन, चिंतन हे सुरू आहे. टिव्हीवरील बातम्या पाहून ते खिन्न होतात. राज्यातीलच नव्हे, तर देश व जगभराची चिंता त्यांना सतावत असते.

दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात राळेगणसिद्धी येथे कोरोनाविषयक नियमांचे कठोरपणे नियम पालन होत आहे. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश दिला जात नव्हता. प्रत्येक ग्रामस्थांवर आरोग्यविभागाची नजर असल्याने गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. हजारे यांनीही अवाहन करून लोकांना भेटीसाठी येवू नये, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे गावातील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत झाली. गावातील सरपंच, पदाधिकारी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतात. गावात परजिल्ह्यातील लोक किंवा कोणाचे नातेवाईक येणार नाहीत, याची आवर्जुन काळजी घेतली जाते. गरजेनुसार हजारे फोनवरून संवाद साधून संवाद साधतात. राज्यातील मंत्री, अधिकारी यांच्याशीही दूरध्वनीवरूनच चर्चा करून चर्चा करण्याचे नियोजन करतात. कोरोनाविषयक केंद्र व राज्य सरकार करीत असलेल्या सर्व उपाययोजनांना नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोरोना ही मोठी महामारी असून, ते केवळ एका देशाचे नव्हे, तर संपूर्ण जगावरचे संकट आहे. या संकटाला राजकारण बाजुला ठेवूनच तोंड दिले पाहिजे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्यविभाग चांगले काम करीत असून, त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख