`अनिलभैय्या गेले, हा मोठा आघात,` मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली - `Anilbhaiyya is gone, this is a big shock,` Tribute to Chief Minister Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

`अनिलभैय्या गेले, हा मोठा आघात,` मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली

मुरलीधर कराळे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

शिवसेना ज्यांच्या रक्तात होती, आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता, तो काळाने निष्ठूरपणे थांबविला.

नगर : ``शिवसेना ज्यांच्या रक्तात होती, आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता, तो काळाने निष्ठूरपणे थांबविला. अनिल भैय्या गेले ही वाईट बातमी कळाली आणि धक्का बसला,`` अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.

आज पहाटे शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण करून तो संदेश पाठविला आहे.

मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैय्या यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतानाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली, हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच, पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे. 

युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे, या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली. त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले, तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे, असे समजणाऱ्या  अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्याकडून शोक व्यक्त

``माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व  काळाच्या पडद्याआड गेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,`` ही प्रार्थना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख