अनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख - Anil Rathore was to be a minister: Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख

मुरलीधर कराळे
रविवार, 27 सप्टेंबर 2020

मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यात अनिल राठोड यांचे सहकार्य मोलाचे होते. खरं तर तेच मंत्री होणार होते, अशा शब्दांत गडाख यांनी भावना व्यक्त केल्या.

नगर : ``शिवसेना आणि कै. अनिल राठोड हे समिकरण होते. त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे काम केले. हाकेला धावणारा नेता, म्हणून त्यांची सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा होती. मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यात राठोड यांचे सहकार्य मोलाचे होते. खरं तर तेच मंत्री होणार होते,`` अशा शब्दांत मृदू व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.

नगरमध्ये शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी गडाख यांच्यासह शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते तसेच मान्यवर उपस्थित होते.

गडाख म्हणाले, की राठोड यांच्या जाण्याने शहराची, शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. शहरात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघणे अशक्य आहे. परंतु अनिल भैय्यांनी केलेल्या कामाचा आदर्श घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तरी ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. ते शिवसेनेचे नेते होते, परंतु त्यांनी त्यांनी खऱ्या अर्थाने नगर शहरातील फाटक्या-तुटक्या लोकांचे नेतृत्त्व केले. राजकारण डोक्याने करावे लागते, परंतु त्यांनी भावनेने राजकारण केले. त्यांच्याकडे कितीही छोटा माणूस आला आणि समोर कितीही मोठा अधिकारी असला, तरी अनिल भैय्या त्या छोट्या माणसासाठी अधिकाऱ्यांकडून काम करून घेणार, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. तब्बल 25 वर्ष आमदार राहण्यामागे त्यांचे सर्वसामान्यांचे काम हेच गमक होते. मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यासाठी भैय्यांचे योगदान होते. खऱं तर मंत्री तेच होणार होते. परंतु निवडणुकीत त्यांना विजयश्रीने हुलकावणी दिली. मी निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी ठाकरे यांनी सांगितले, की अनिल भैय्यांना भेटा, ते तुम्हाला मदत करतील. 

या वेळी मान्यवरांनी भाषणातून राठोड यांना आदरांजली अर्पण केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख