खळी ग्रामपंचायतीत विखे - थोरात यांच्या गटात युती  - Alliance in Vikhe-Thorat group in Khali Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

खळी ग्रामपंचायतीत विखे - थोरात यांच्या गटात युती 

आनंद गायकवाड
मंगळवार, 12 जानेवारी 2021

विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले राज्यातील दोन दिग्गज नेते म्हणून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची ओळख आहे.

संगमनेर : तालुक्‍याच्या पूर्व भागातील खळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यात अपयश आल्याने स्थानिक पातळीवर विखे पाटील व महसूलमंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी गावाचा विकास केंद्रस्थानी मानून युती केली आहे. कट्टर विरोधकांच्या या आगळ्या वेगळ्या युतीची चर्चा तालुक्‍यात होत आहे. 

विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले राज्यातील दोन दिग्गज नेते म्हणून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची ओळख आहे. कॉंग्रेस पक्षाच्या एका व्यासपीठावरील त्यांचा संघर्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपात प्रवेश केल्यानंतर अधिकच टोकदार झाला. स्वतःच्या अस्तित्वासाठी या संघर्षाची धार कायम ठेवण्याचे काम स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते सातत्याने करीत असतात. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्‍यावर सत्ता अबाधित राखण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असतो. यांचे नेतृत्व मानणाऱ्या दोन गटातील पुढाऱ्यांनी गावाच्या विकासाचा अजेंडा पुढे करीत ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसल्याने, एकत्र येत निवडणूकीला सामोरे जाण्याचा नवीन पायंडा पाडला आहे, मात्र यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या अघटिताची चर्चा होत आहे. 

खळी ग्रामपंचायतीत तीन प्रभागातील नऊ जागांसाठी निवडणूक होणार होती. यासाठी बिनविरोधचे प्रयत्न सुरू होते. याला नेत्यांनी होकार दिला होता. मात्र सुकाणू समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे केवळ पाच जागा बिनविरोध करण्यात राजेंद्र चकोर व सुरेश नागरे यांना यश आले. चार जागावर एकमत होत नसल्याने प्रभाग 2 व 3 मधील 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून ग्रामविकास पॅनलची स्थापना केली असून, या पॅनलच्या फलकांवर विखे व थोरातांची छायाचित्रे झळकत आहेत. या पॅनलचे प्रभाग 1 मधून सचिन आव्हाड, सुनिता कांगणे, कवराबाई घुगे, प्रभाग 2 मधून मंडव घुगे व प्रभाग 3 मधून राजेंद्र चकोर हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनल व ग्रामविकास पॅनलमध्ये चार जागांसाठी अटीतटीची लढत होत आहे. महाराष्ट्राचे या ग्रामपंचायतीकडे लक्ष लागणार आहे.

स्थानिक निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपांमुळे नंतर निर्माण होणारी कटूता टाळून विकासाला महत्व देत दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 
- राजेंद्र चकोर, कॉंग्रेस 

गावाचा विकास केंद्रस्थानी मानून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अपयश आल्याने दोन्ही गट चांगल्या उद्देशाने एकत्र आले आहेत. 
- शरद नागरे, भाजप 

खळी गावाचा विकास खुंटला असून, येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व प्रशासकिय अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याने परिवर्तन पॅनलच्या माध्यामातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सोमनाथ नागरे, परिवर्तन पॅनल 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख