नगर : भाजपचे माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपच्या पदाधकारी निवडीमध्ये भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीसपद देवून त्यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. आता वडीलांच्या अनुभवाच्या शिदोरीवर ते विविध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी नुकतीच जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये 8 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, तर 9 चिटणीस, 1 खजिनदार, 1 प्रसद्धीप्रमुख, तर 1 सोशल मीडियाप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इतर आघाडीचे अध्यक्ष, सरचिटणीस जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये युवा मोर्चाचे अध्यक्षपदी सत्यजित कदम, तर सरचिटणीस म्हणून अक्षय कर्डिले यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्त्व करताना त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावले. गेले 25 वर्षे आमदारकी करताना जिल्ह्याच्या नव्हे, तर राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या दोन्ही विधानसभेच्या टर्ममध्ये अक्षय यांनी प्रचाराची धुरा बऱ्यापैकी सांभाळली होती. त्यामुळे युवकांमध्ये त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अक्षय यांनी विविध मंडळांच्या माध्यमातून राहुरी मतदारसंघात युवा नेता म्हणून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ज्या कार्यक्रमांना शिवाजी कर्डिले पोहचू शकणार नाहीत, तेथे स्वतः अक्षय यांनी हजेरी लावून जनसंपर्क कायम ठेवला आहे. नगर तालुक्यात कर्डिले कुटुंबियाचे राजकारणात विशेष स्थान आहे. त्याचा फायदा अक्षय यांना आगामी काळात होणार आहे. पदवीचे शिक्षण घेत असताना अक्षय यांनी महाविद्यालयीन प्रश्न सोडविले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलने केली. त्या कामांचा फायदा आगामी काळात होणार आहे.
आगामी काळात निवडणूक रिंगणात
निवड झालेल्या पदाला आपण पुरेपुर न्याय देवू. आगामी काळात शेतकऱ्यांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण विशेष प्रयत्न करू. विविध निवडणुकांच्या रिंगणात उतरून, समाजातील प्रश्न सोडविणार असल्याचे मत अक्षय कर्डिले यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.