अकोलेकरांनी अनुभवली झुंज नेत्यांची अन दोन बिबट्यांचीही - Akolekar also experienced the struggle of leaders and two leopards | Politics Marathi News - Sarkarnama

अकोलेकरांनी अनुभवली झुंज नेत्यांची अन दोन बिबट्यांचीही

शांताराम काळे
मंगळवार, 19 जानेवारी 2021

दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंझीत रक्तबंबाळ झालेल्या एका छोट्या आणि दुसऱ्या मोठ्या अशा या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एकच्या सुमारास घडली

अकोले : गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर नेत्यांच्या झुंजी पाहण्यास मिळाल्या. अकोले तालुक्यातील गावांत नेत्यांच्या झुंजीबरोबरच दोन बिबट्यांची झुंज प्रथम अनुभवायला मिळाली. ग्रामस्थांसमोर सुरू असलेली ही झुंज सोडवण्याचे धाडस कोणातच नव्हते, मात्र सकाळी दोन्हीही बिबटे मृतावस्थेत आढळले. रविवारी रात्री ही घटना घडली.

दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंझीत रक्तबंबाळ झालेल्या एका छोट्या आणि दुसऱ्या मोठ्या अशा या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एकच्या सुमारास घडली.

रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका ऊसाचा क्षेत्रात एक सात ते आठ महिन्याचा मादी व एक ते सव्वा वर्ष्याचा नर यांच्यात झुंज सुरू होती. या वेळी त्यांचा डरकाळ्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. मात्र समोर जाण्यास कोणीही तयार झाला नाही. या वेळी इतर एक बिबट त्या ठिकाणी असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

सोमवारी सकाळी उठल्यावर शेजारील लोकांना हे दोन्ही बिबटे मृत झाल्याचे आढळून आले. ही माहिती तेथील लोकांनी अकोले वनविभागास कळविले. घटनेची माहिती मिळताच अकोल्याच्या वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी ही उपविभागीय वनाधिकारी जी. ए. झोळे यांना दिली.

झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पोले, वनरक्षक विजय जावळे, वनपाल घोडसरे घटनास्थळी जाऊन घटनेची प्राथमिक माहिती तेथील स्थानिकांकडून घेत या दोन्ही बिबट्यांचा पंचनामा केला.

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. यात या दोन्ही बिबट्यांच्या अंगावर जखमा झाल्या असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पोले यांनी सांगितले.

 

हेही वाचा..

तीन ग्रामपंचायतींच्या निकालांवर हरकती 

श्रीरामपूर : तालुक्‍यातील कारेगाव, भेर्डापूर आणि टाकळीभान येथील ग्रामपंचायतींच्या निकालांबाबत हरकती घेण्यात आल्या आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. 

कारेगाव, भेर्डापूर व टाकळीभान येथे मतदानावेळी आमच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम यंत्रावर वेळोवेळी हरकती घेतल्या; परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. ईव्हीएमवर हरकती नोंदविण्याचा अधिकार प्राथमिक कक्षेत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक निकालानंतर फेरमतमोजणीची मागणी करीत असून, ईव्हीएममध्ये व्हीव्ही पॅट प्रणाली उपलब्ध नाही.

मतदान होण्याआधी व निकाल मिळेपर्यंतच्या काळात हे उपकरण हॅक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारी तांत्रिक प्रयोगशाळेत मतदान यंत्र तपासाचा अहवाल मिळेपर्यंत निकालास स्थगिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब पटारे यांच्या समवेत विविध उमेदवारांनी सह्या केल्या आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख