शिर्डी : पहाटे शपथविधी झाला, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आमदार गोळा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळ मिळाला नाही. आमची अपेक्षा आहे, ते पुन्हा आमच्याकडे येतील. आम्ही त्यांची वाट पहात आहोत, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत भविष्यवाणी केली.
युपीएचे नेतृत्व कुणी करायचे, यावरून वादंग सुरू राहिले, तर कॉंग्रेस पक्ष सरकारातून बाहेर पडेल. शिवसेनेचे आमदार देखील फुटू शकतील. शिवसेनेने बाहेर पडायचे ठरविले, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भाजपने दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावे. हा प्रस्ताव घेऊन आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करू, असे ते म्हणाले.
आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. या वेळी काकासाहेब खंबाळकर, रमेश मकासरे, श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड, सुनील साळवे, सुनील थोरात, भिमा बागूल, विश्वनाथ काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, की युती केल्याशिवाय निवडणुकीच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला यश मिळू शकत नाही. ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी, तर आपल्या पक्षाच्या नावातून रिपब्लिकन हा शब्द देखील काढून टाकला. सर्व नेत्यांनी एकत्र यावे, त्यांनी अध्यक्ष व्हावे, असे आवाहन मी केले होते. त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडणुकात मते खाणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांनी आता तरी एनडीएत यावे. मी निळा झेंडा आणि रिपब्लिकन पक्ष कायम ठेवला आहे.
देशभरातील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे लोकसभेतील बळ दोन वरून तिनशे पर्यंत वाढले. मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले. ते शेतकऱ्यांच्या विरोधात कधीही कायदा करणार नाहीत. सुधारीत कृषि कायदे शेतकरी हिताचे आहेत. कायद्यात दुरूस्ती होऊ शकते, मात्र कायदे मागे घ्या, ही पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांची मागणी संविधानाला धरून नाही. राज्यातील महानगर व नगरपालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत युती करू. त्याबाबत येत्या 5 जानेवारी रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांनी भाजपप्रणीत आघाडी किंवा पक्षविरहित आघाडीसोबत रहावे, अशा सूचना आपण दिल्या आहेत. पक्षाचे राज्य कार्यकारीणी सचिव विजय वाकचौरे यांनी स्वागत व आभारप्रदर्शन केले.
सदस्य नोंदणीशिवाय पक्षात घेतले जाणार नाही
रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम सुरू आहेत. सदस्य नोंदणी केल्याशिवाय कुणालाही पक्षात पद दिले जाणार नाही. पक्षाचा विस्तार सर्व समाज घटकात व्हावा, असा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारला मराठा आरक्षण न्यायालयात टिकविता आले नाही, असे आठवले यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

