शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घ्यायला अजितदादांचा नकारच होता पण... - Ajit Pawar refused to take Shiv Sena corporator in NCP but ... | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घ्यायला अजितदादांचा नकारच होता पण...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

राज्यात महाआघाडी सरकार असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस यांच्यासह इतर मित्र पक्ष व्यवस्थित कारभार पाहत आहेत. अडचणीच्या काळात एकमेकांना विश्वासात घेवून निर्णय घेत आहेत. त्यामुळे एकमेकांचे नगरसेवक फोडण्याचा प्रश्नच येत नाही.

नगर : शिवसेनेचे ते पाच नगरसेवक राष्ट्रवादीत घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नकारच होता. त्यांची पक्षांतराची भूमीका योग्य नसल्याचे पवार यांनी नगरसेवकांना वारंवार सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. राष्ट्रवादीत घेतले नाही, तर ते भाजपमध्ये जाणार होते. पारनेरमध्ये भाजपची ताकद वाढू नये, याच उद्देशाने त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी सरकारनामा शी बोलताना दिली.

आमदार लंके म्हणाले, की राज्यात महाआघाडी सरकार असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस यांच्यासह इतर मित्र पक्ष व्यवस्थित कारभार पाहत आहेत. अडचणीच्या काळात एकमेकांना विश्वासात घेवून निर्णय घेत आहेत. त्यामुळे एकमेकांचे नगरसेवक फोडण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आगामी काळात पारनेर नगरपंचायत कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जावू नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. त्या नगरसेवकांना शिवसेनेत राहण्याची इच्छा नव्हती. त्यांना आम्ही ताकद देत होतो. त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आम्ही आश्वासन दिले होते, तथापि, ते नगरसेवक एकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

अजितदादांनीही त्यांना खूप समजावून सांगितले पण...

त्या नगरसेवकांनी अजितदादांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी नगरसेवकांना समजावून सांगितले. तुम्ही शिवसेनेतच थांबा. तुमच्या प्रभागातील सर्व प्रश्न दोन्ही पक्षांच्या विचारांनी समन्वयाने सोडवू. तुम्हाला राष्ट्रवादीत घेणे योग्य राहणार नाही, तुम्हाला पक्षात घेता येणार नाही, असे निक्षुण सांगितले होते, तथापि, त्या नगरसेवकांनी दादांना विनंती केली. आम्हाला राष्ट्रवादीत घेतले नाही, तरीही आम्ही शिवसेनेत राहणार नाही. आम्हाला तिथे राहणे यापुढे जमणार नाही. त्यामुळे पर्यायाने आम्हाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, असे नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे दादांनी हा निर्णय घेतल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

राज्य पातळीवर होतेय जोरदार चर्चा

दरम्यान, या प्रकरणाची राज्य पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना व राष्ट्रवादी राज्यात एकत्रित असताना असे झाले कसे, याबाबत राजकीय खल सुरू आहे. याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असून, दोन्ही पक्षांमध्ये काही धुसफूस होऊ शकते का, अशी चर्चा आहे. विरोधी भाजपचे नेते या प्रकरणाचा कसा फायदा उठवितात, याबाबतही आता लोकांचे लक्ष लागले आहे. एकूणच पारनेरच्या या प्रकरणामुळे दोन्ही पक्षाचे राजकारण ढवळून निघाले आहे. ही चर्चा थांबविण्यासाठी मात्र दोन्ही पातळीवर प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख