कोपरगावात हवा विलगीकरण कक्ष, स्नेहलता कोल्हेंचे राजेश टोपे यांना साकडे - Air Separation Room in Kopargaon, Snehalta Kolhe's Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

कोपरगावात हवा विलगीकरण कक्ष, स्नेहलता कोल्हेंचे राजेश टोपे यांना साकडे

मनोज जोशी
गुरुवार, 1 एप्रिल 2021

तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या ही चिंताजनक ठरत असून, त्यासाठी कठोर पाउले उचलण्याची गरज असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे.

कोपरगाव : शहर व तालुक्यातील गावांमध्ये रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असून, भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, संशयीत रूग्णांच्या चाचणीचा उशीरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रूग्णांची संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तातडीने विलगीकरण कक्षाची व्यवस्था करून कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या ही चिंताजनक ठरत असून, त्यासाठी कठोर पाउले उचलण्याची गरज असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे.

पत्रकात त्यांनी म्हंटले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून सुरळीतपणे सुरू असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झालेले असून, रोज रूग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे, मात्र अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने संशयित रूग्णाची तपासणी केल्यानंतर अहवाल येण्यास 4-5 दिवसाचा कालावधी लागतो, या विलंबाच्या काळात सदरचा संशयित रूग्ण हा समाजव्यवस्थेच्या संपर्कात येतो, तसेच घरी न थांबता फिरत असल्याने अनेकांशी संपर्क येतो, त्यामुळे रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे.

वास्तविक संशयित रूग्णास तातडीने विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतू ती सुविधाच नसल्याने तालुका व शहरभर रूग्णसंख्येच्या आकडयात दिवसेंदिवस भर पडत असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेउन कोपरगाव विधानसभा मतदार संघात विलगीकरण कक्ष उभारावेत, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, म्हणजे सामान्य नागरीकांच्या जीवितास होणारा धोका टळेल, तसेच वाढती रूग्णसंख्या घटण्यास मदत होईल, असेही कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा... 

दिवसभरात चौघांचा मृत्यू; जिल्ह्यात 1319 बाधित आढळले 
 

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या जात आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीने वेग घेतला आहे. आज (गुरुवारी) दिवसभरात नवे 1319 रुग्ण आढळले आहेत. 
जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 96 हजार 241 झाली आहे. दिवसभरात बरे झालेल्या 829 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 87 हजार 819 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.25 टक्के आहे. दिवसभरात आज चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेरपर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार 222 झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या सात हजार 200 झाली आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 447, खासगी रुग्णालयातील तपासणीत 400, अँटिजेन चाचणीत 472 रुग्ण आज आढळून आले. नगर शहरात सर्वाधिक 362 नवे रुग्ण आढळून आले. नेवासे तालुक्‍यात रुग्णसंख्येने आता वेग घेतल्याचे दिसत असून, तेथे दिवसभरात शंभर जण बाधित आढळले. 

शहरासह जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असली, तरी अनेक जण अद्यापही विनामास्क फिरत आहेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने कारवाईचा वेग वाढविणे गरजेचे असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. 

तालुकानिहाय बाधितांचा आकडा 

कोपरगाव 144, श्रीरामपूर 91, पाथर्डी 65, संगमनेर 64, अकोले व राहाता प्रत्येकी 63, नगर 58, शेवगाव 53, राहुरी 51, कर्जत 50, श्रीगोंदे 34, जामखेड 32, पारनेर 28, भिंगार 39, लष्करी रुग्णालय दोन, अन्य जिल्ह्यांतील 19. परराज्यातीलही एक रुग्ण आज आढळून आला. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख