नगर : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट देऊन आंदोलकांचे आभार मानले. आंदोलन सुरु असले, तरी या काळात शेतकऱ्यांना बियाणे विक्री व कृषी सल्ला त्यांनी चालूच ठेवली. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ दिली नसल्याबद्दल तनपुरे यांनी या आंदोलकांचे आभार मानले.
सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांचा आज चाैदावा दिवस असून, त्यांनी आता लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. काळ्या फिती लावून त्यांनी हे आंदोलन सुरू केले असून, गेटजवळ घोषणाबाजी केली जात आहे.
मंत्री तनपुरे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. या वेळी आंदोलकांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तनपुरे यांनी चर्चा केली. आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ दिली नाही. बियाणे विक्री केंद्र, सल्ला सेवा केंद्र सुरूच ठेवल्याबद्दल तनपुरे यांनी आंदोलकांचे आभार मानले.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डाॅ. उत्तम कदम, डाॅ. महावीरसिंह चाैहान, मच्छिंद्र बाचकर आदींनी सांगितले. या आंदोलनाची महाराष्ट्रात राज्यभर चर्चा सुरू आहे.
या आहेत मुख्य मागण्या
कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, आश्वासीत प्रगती योजना लागू व्हावी या प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. असे असले, तरी केवळ शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून कर्मचाऱ्यांनी बियाणे विक्री सुरूच ठेवली आहे. तसेच कृषी सल्ला सेवा केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ लेखणी बंद करून प्रशासकीय कामे बंद ठेवण्यात आली आहेत. तथापि, शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काळजी घेतली जात आहे. याच कारणासाठी मंत्री तनपुरे यांनी त्यांचे आभार मानले.
तनपुरे यांनी स्विकारले निवेदन
कृषी विद्यापीठातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले असले, तरी आज मंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून हे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तनपुरे यांनीही या आंदोलकांना आश्वासन देऊन ही बाब संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन या प्रश्नी लक्ष घालू, असे आश्वासन दिले. मंत्र्यांनी आश्वासन दिले असले, तरी आगामी काळात हे आंदोलन सुरूच होणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

