रुग्णालयातून परतताच पिचड यांचा बिबट्याप्रश्‍नी अधिकाऱ्यांना फोन - After returning from the hospital, Pichad called the authorities about the leopard problem | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णालयातून परतताच पिचड यांचा बिबट्याप्रश्‍नी अधिकाऱ्यांना फोन

शांताराम काळे
शनिवार, 23 जानेवारी 2021

तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी गर्दी केली. रुग्णालयातून येताच शेतकऱ्यांनी बिबट्या, वन्य प्राण्यांबाबत मांडलेल्या प्रश्‍नांबाबत पिचड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, संबंधित प्रश्‍न सोडविण्याबाबत सूचना केल्या. 

अकोले : माजी मंत्री मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर ते आज राजूर येथे निवासस्थानी आले. त्यामुळे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी गर्दी केली. रुग्णालयातून येताच शेतकऱ्यांनी बिबट्या, वन्य प्राण्यांबाबत मांडलेल्या प्रश्‍नांबाबत पिचड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, संबंधित प्रश्‍न सोडविण्याबाबत सूचना केल्या. 

खडकी, रतनवाडी, कुमशेत येथील आदिवासी ग्रामस्थांनी गप्पांच्या ओघात, "साहेब, बिबटे रोज दिसू लागले. माणसे जखमी केली, जनावरे मारली, शेळ्या मारल्या, रानडुकरांनी वावरातील भुईमूग खाल्ला,' असे म्हणताच पिचड यांनी वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळ यांना फोन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत चर्चा केली. 

"आधीच कोरोनाने लोक हैराण; त्यात रोजगार नाही. बिबट्याच्या उपद्रवाने शेतकरी घराबाहेर कसा पडेल? तुम्ही लक्ष घाला अन्‌ माणसं वाचवा,'' असे त्यांनी सांगताच अधिकारीही चकित झाले. "साहेब, उद्याच बंदोबस्त करतो,' असे आश्‍वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. आपल्या प्रश्‍नांबाबत पिचड यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा..

आजाराबाबत चालढकल करणे चुकीचे : डॉ. नवले 

अकोले : येथील राष्ट्रसेवा दलाने आदिवासी ग्रामीण महिलांसाठी आयोजित केलेले डॉ. दीपाली नवले यांचे, "महिलांचे आरोग्य' या विषयावरील व्याख्यान झाले. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. कधी अज्ञान, तर कधी अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एखाद्या आजाराबद्दल चालढकल, ही सर्व कारणे महिलांच्या आरोग्याची चिंता वाढविणारी आहेत. 

स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. दीपाली नवले यांनी उपस्थित महिलांच्या सर्व प्रश्‍नांना, समर्पक व वैद्यकीय शास्त्राचा आधार घेत उत्तरे दिली. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदाब आणि थायरॉईड झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारातील बदल, ही सर्व कारणे महिलांच्या आजारपणाला आमंत्रण देत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सल्ला डॉ. दीपाली यांनी दिला. 

या संकटातून मुक्ती हवी असेल, तर सेंद्रिय शेतीला आपण प्राधान्य दिले पाहिजे, तरच मानवजातीचे आयुर्मान वाढू शकते. अन्यथा, आरोग्याच्या मोठ्या संकटाला आपणास सामोरे जावे लागेल, अशी भीती डॉ. दीपाली नवले यांनी व्यक्त केली. सचिव पूनम कदम यांनी आभार मानले. राष्ट्रसेवा दलाच्या अध्यक्ष सुनंदा मेढे, इर्शाद सय्यद, मीनल चासकर आदी उपस्थित होते. 
 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख