पारनेर : तालुक्यात आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन 25 लाख विकासनिधी मिळवा, असा फंडा सुरू केला आहे. त्यास तालुक्यातून चांगला प्रतीसाद मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी राळेगणसिद्धी येथील ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पानोली व कारेगाव या दोन गावांनी सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार लंके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.
आमदार लंके यांच्या आवाहनास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकेच नव्हे, तर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व महाराष्ट्र आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीसुद्धा ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे समर्थम केले आहे. हजारे यांनी तर या मोहिमेचा प्रचार करण्याचेच सुतोवाच केले आहे.
लंके यांनी दोन दिवसांपूर्वी सुपे जिल्हा परिषद गटातील गावांच्या बैठका घेतल्या व अनेकांशी सवांद साधत निवडणुका बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. तिचा अनेकांनी स्विकार करण्याचेही आश्वसान दिले. आज लंके यांच्या उपस्थितीतपानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. काल सुद्धा टाकळी ढोकेश्वर गटातील गावांच्या बैठका घेतल्या आहेत. ते तालुक्यातील पाचही गटात बैठका घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करणार आहेत.
दरम्यान, तालुक्यातील सुमारे वीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असल्याचे अॅड. राहुल झावरे यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत आणखीही काही गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील, असे चित्र असल्याचे झावरे म्हणाले.
Edited By - Murlidhar Karale

