इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पिचड यांच्यानंतर आता `मनसे`ही रस्त्यावर - After Pichad in support of Indorikar Maharaj, now MNS is also on the road | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पिचड यांच्यानंतर आता `मनसे`ही रस्त्यावर

मुरलीधर कराळे
शनिवार, 11 जुलै 2020

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ देवून कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. महाराजांवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

नगर : अकोले तालुक्याचे भूमिपूत्र कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी याच प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता मनसेनेही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. आज मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली.

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ देवून कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. महाराजांवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तथापि, महाराजांवर गुन्हा दाखल झाला. कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम ही मंडळी करीत असतात. एखाद्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे, ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. त्यामुळे तालुक्यातून याबाबत निषेध व्यक्त होत आहे. इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना आंदोलन करीत आहेत. 

वैभव पिचड यांनी मागील आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला. महाराजांवरील गुन्हे मागे घेतले नाही, तर वारकरी आंदोलन करतील. तसेच या आंदोलनात आपण अग्रभागी राहू, असा इशारा दिला होता. आता राष्ट्रवादीबरोबरच इतर पक्षही त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत. काल मनसेच्या काही नेते व कार्यकर्त्यांनी महाराजांच्या घरी जावून त्यांना आपली साथ असल्याचे जाहीर केले. तसेच आगामी काळात या प्रश्नी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे जाहीर केले. 

कीर्तनकारांनी घेतला धसका

दरम्यान, इंदोरीकर प्रकरणामुळे आता कीर्तनकारांनी धसका घेतला आहे. बोलण्याच्या ओघात आपल्याकडून काही अपशब्द जावू नयेत. किंवा समाजात उद्रेक होईल, असे शब्द न जाण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे बहुतेक महाराज आता कीर्तन करताना कोणी मोबाईलने शुटिंग घेण्याचा प्रयत्न केला, की लजेचच विरोध करीत आहेत. मोबाईलद्वारे आपले कीर्तन व्हायरल न होण्याबाबत अनेकजण आग्रही असतात. 

एकीचे बळ पण अडचणी पुष्कळ

इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी एकीचे बळ दाखवत वारकरी संप्रदायातील अनेक साधक एकत्र येत आहेत. तथापि, आंदोलने करणे, विरोधासाठी रस्त्यावर येणे यासाठी कोरोनामुळे बंधणे आहेत. त्यामुळे ही मंडळी रस्त्यावर येण्यास घाबरत आहेत. कोरोनाविषयक नियमांनुसार संचारबंदी असल्याने आंदोलनाला अनेक अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया काही महाराजांनी व्यक्त केल्या.

 

 

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख