After a month and a half, the sale of liquor started in the nagar | Sarkarnama

दीड महिन्याची कसर काढली, रखरखत्या उन्हात थांबून अखेर `घेतलीच`

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 मे 2020

भर उन्हात दुपारी दोनच्या दरम्यानही काही ठिकाणी तब्बल अर्धा किलोमीटर तळीराम रांगेत उभे राहिले. कडक उन्हाचा चटका, रस्त्यावर तापलेली डांबरी सडक, प्रचंड उकाडा याची तमा न करताही दारु खरेदी करूनच संबंधित मंडळी घरी गेली.  

नगर : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आज मद्यविक्रीची दुकाने उघडल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात मद्यविक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी केली. शहरातील काही मोठ्या दुकानदारांनी रस्त्यावर सामाजिक अंतर पाळत विक्री करण्याचे नियोजन केले. तेथे भर दुपारच्या वेळी रखरखत्या उन्हात तळीराम तास-दोन तास रांगेत उभे राहिले, पण अखेर दारू घेवूनच माघारी गेले.
राज्यभर काल सकाळपासून मद्यविक्री सुरू झाली असली, तरी जिल्हाधिकाऱ्यांनी काल उशिरा आदेश काढून आजपासून दारुविक्रीला परवानगी दिली. त्यामुळे मद्यपींनी आज सकाळपासूनच दारुच्या दुकानासमोर गर्दी केली. सकाळी दहापासून विक्री सुरू झाली. आज भर उन्हात दुपारी दोनच्या दरम्यानही काही ठिकाणी तब्बल अर्धा किलोमीटर तळीराम रांगेत उभे राहिले. कडक उन्हाचा चटका, रस्त्यावर तापलेली डांबरी सडक, प्रचंड उकाडा याची तमा न करताही दारु खरेदी करूनच संबंधित मंडळी घरी गेली.  

सोशल डिस्टन्सचा बोजवारा
दरम्यान, रस्त्यावरील मोठ्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचा नियम पाळला गेला, मात्र गल्लीबोळातील दुकानांमध्ये मद्यपींनी प्रचंड गर्दी केली. तेथे पोलिसांनीही कानाडोळा केला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडवत अनेकांनी दारु खरेदीचा आनंद घेतला. काही ठिकाणी दुकानदार व ग्राहक यांच्यात गुरबुरी झाल्या. भांडणे होऊ नये म्हणून बहुतेक मद्यविक्रीत्यांनी जवळ युवकांची फाैज ठेवलेली दिसून आली.

संगमनेरमध्ये पहाटेपासूनच रांगा  
संगमनेर : आज मद्याची परवानाधारक दुकाने उघडणार असल्याच्या आनंदातून, पहाटे पाचपासून ग्राहकांनी दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने आज संगमनेरातील नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका दुकानासमोर मद्यपींची रांग लागली होती. दुकानासमोर सावलीसाठी टाकलेला मंडप, मंदिरातील दर्शनबारीसारखी केलेली व्यवस्था आणि सुमारे 500 मीटरपर्यंत लागलेली सर्व वयोगटातील मद्यपींची रांग महामार्गावरील प्रवाशांना अचंबित करीत होती.
फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. नंबर लावून मिळालेल्या मद्याच्या बाटल्या पिशव्यांमध्ये भरुन हसऱ्या चेहऱ्याने लोक रवाना होत होते. रणरणत्या उन्हातील 38 अंश सेल्सियस तपमानात मद्याच्या तपश्चर्येसाठी ठामपणे उभ्या असलेल्या या लोकांनी दुपारी 12 च्या सुमारास प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकाने बंद केल्याने मोठा झटका बसला.

शर्टात बांधले गाठोडे
एरवी समाजापासून चोरुन लपून दारुचा आस्वाद घेणारी युवा पिढी आज मात्र उघड्यावर आली होती. कोणाचीही पर्वा न करता, तोंडाला मास्क बांधून ओळख लपवित खुलेआम रांगेत उभ्या असलेल्य़ा युवकांची संख्या लक्षणिय होती. काहींनी पिशव्या नसल्याने, अंगातील शर्टात गाठोडे बांधून बाटल्या नेल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख