Advising Uddhav Thackeray to get out of Matoshri is cruelty | Sarkarnama

उद्धव ठाकरे यांना `मातोश्री`बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा चंद्रकांत पाटलांचा क्रूरपणा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

वहाडणे हे मूळ भाजपचे नेते तथा नरेंद्र मोदी विचारमंचचे संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली ही टीका म्हणजे भाजपला घरचा आहेरच मानला जातो.

कोपरगाव : "कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे,' असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यनच केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना "मातोश्री'बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी कडवट टीका कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज केली.

वहाडणे हे मूळ भाजपचे नेते तथा नरेंद्र मोदी विचारमंचचे संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली ही टीका म्हणजे भाजपला घरचा आहेरच मानला जातो.

वहाडणे यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा सन्मान करणारा, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद उपक्रम यशस्वी केला. विरोधी पक्षाचे असूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासीयांना साद घालून, देशभर दिवे उजळवून सर्व भारतीयांची एकजूट आहे, असे जगाला दाखवून दिले आणि जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट, महाराष्ट्र भाजपने "माझे अंगण, माझे रणांगण' अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला, हेच कळत नाही. याच न्यायाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध असेच आंदोलन करायचे का? अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये?'' 

विशेष म्हणजे वहाडणे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नरेंद्र मोदी विचार मंचाची स्थापना करून कोपरगावची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत एकहाती जिंकली होती.

हेही वाचा...

"बबनराव पाचपुतेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही' 

श्रीगोंदे : कोरोना संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले असताना आमदार बबनराव पाचपुते राज्य सरकारवर टीका करीत आहेत. वास्तविक, पाचपुते हे शिवसेनेच्याच मतांवर आमदार झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अथवा सरकारवर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी केली. 

पत्रकात शेलार यांनी म्हटले आहे, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार नियोजनबद्धरीत्या कोरोनाची परिस्थिती हाताळत आहे. सर्व मंत्री अहोरात्र कष्ट घेत आहेत. जनतेने वेळोवेळी सरकारचे कौतुकही केले आहे. उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्य सरकारचे कौतुक केले. एवढे चांगले काम सरकार करीत असताना पाचपुते सरकारवर टीका करीत आहेत. खरे तर ही वेळ राजकारण करण्याची नाही. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. 

अनेक आमदारांनी त्यांच्या कारखान्यांतर्फे सॅनिटायझर तयार करून त्याचे जनतेला वाटप केले. आपण मात्र साईकृपा कारखान्याचे स्पिरीट कुठे, कशासाठी पाठविले, हे जगजाहीर आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या सरकारवर टीका करण्यापेक्षा, आंदोलने करण्यापेक्षा कोरोना संकटात आपण काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शेलार यांनी दिला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख