The administration has come up with an alternative to ban corona in Sangamner | Sarkarnama

संगमनेरमध्ये कोरोनाला प्रतिबंधासाठी प्रशासनाने असा काढला पर्याय

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीत 1 जूनपासून ते सुरू करण्यात आले. आजवर 11 कोरोना बाधित रुग्ण येथून बरे होवून गेल्याने संगमनेरकरांना दिलासा मिळाला आहे.

संगमनेर : सुमारे अडीच महिन्यांपासून संगमनेरमध्ये कोरोना मिटर सातत्याने हलते राहिले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी आजपर्यंत आठजण मृत्यूच्या दाढेत गेले आहेत. या पार्श्वभुमिवर संगमनेरचे प्रशासन, वैद्यकिय अधिकारी यांच्या जोडीने विविध संस्था व स्वयंसेवक मदत कार्यात उतरल्या आहेत. त्यांनी आता तालुकास्तरावर मोफत कोविड केअर सेंटर उभारले आहे. त्यानंतर आता कम्युनिटी क्लिनिक सुरू करून कोरोनाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीत 1 जूनपासून ते सुरू करण्यात आले. आजवर 11 कोरोना बाधित रुग्ण येथून बरे होवून गेल्याने संगमनेरकरांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभुमिवर संगमनेरातील एका प्रभागात कोरोना रुग्ण सातत्याने सापडत असल्याने, याबाबत केलेल्य़ा पाहणीत संगमनेरातील बहुतेक रुग्ण शासकीय रुग्णालयाच्या धास्तीने समोर येत नसल्याची बाब समोर आली. यामुळे छुपे रुग्ण शोधणे गरजेचे ठरले होते. त्यासाठी प्रशासनाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच संगमनेर शहरातील अन्य काही सेवाभावी संस्था, उद्योग व नागरिकांच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरु केले. त्याच धर्तीवर प्रशासकिय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयात कम्युनिटी क्लिनीकची सुरवात करण्यात आली आहे. 

या ठिकाणी याच प्रभागातील शंभरापेक्षा अधिक स्वयंसेवक डॉक्टरांच्या मदतीसाठी सरसावले असून, त्यांनी प्रत्येकी दहाच्या गटाने या भागातील आजारी रुग्ण लहान मुले व वयाची साठी पार केलेल्या धोकादायक परिस्थितीत असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. अशा व्यक्तिंची ऑक्सिजन पातळी, हृदयाची गती व ताप यांची नियमितपणे दोनवेळा तपासणी करणार आहेत. या तपासणीत शंका असलेल्या व्यक्तिला मौलाना आझाद मंगल कार्यालयातील कम्युनिटी क्लिनिकमध्ये नेवून तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टराकडून त्याची पुनः तपासणी करण्यात येईल. तेथेही शंका निर्माण झाल्यास संबंधिताबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना देवून पुढील उपचार केले जाणार आहेत. या पध्दतीत आपल्या मोहल्ल्यातील युवकच तपासणी करणार असल्याने, त्यांच्याबाबत असलेल्या जिव्हाळ्यामुळे हे कठीण काम सोपे होण्यास मदत होणार आहे.

राज्यासाठी दिशादर्शक पाऊल ः तांबे

कोरोना बरोबरच सध्या पावसाळ्याचे दिवसही सुरु झाल्याने सामान्य आजारांच्या रुग्णांचीही संख्या वाढणार आहे. मात्र संगमनेरची आरोग्य यंत्रणा पूर्णतः सक्षम असल्याने कोणीही घाबरण्याचे कारण नाही. देशात कोविड बाधितांचा मृत्युदर अगदीच नगण्य असल्याने लक्षणे दिसणार्‍या व्यक्तिला वेळीच उपचार मिळाले, तर संगमनेरात एकही रुग्ण दगावणार नाही. त्यासाठी स्वयंसेवकांच्या पुढाकारातून सुरु झालेले कम्युनिटी क्लिनिक राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे गाैरवोद्गार नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी काढले.

सामुहिक प्रयत्नांतून कोरोनाला हरवू ः मंगरुळे

स्वयंसेवकांच्या व सामुहीक प्रयत्नातून कोरोनाचा पराभव करण्याचा मनोदय आहे. याकामी अधिकाधिक जणांनी सहभागासाठी पुढे येणे गरजेचे आहे. इतर ठिकाणी कोविडच्या उपचारांसाठी भरमसाठ पैसा लागतो, मात्र संगमनेरात ही सुविधा अगदी विनामूल्य उपलब्ध असल्याने रुग्णांनी न घाबरता समोर यावे व उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले.  तहसिलदार अमोल निकम तसेच पोलिस निरीक्षक अभय परमार यांनीही या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख