आदित्य पाैडवाल यांच्या निधनाने नगर जिल्ह्यात आठवणींना उजाळा - Aditya Padwal's demise brings back memories in Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य पाैडवाल यांच्या निधनाने नगर जिल्ह्यात आठवणींना उजाळा

मुरलीधर कराळे
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

`महिमा आगडगाव के कालभैरव का` या चित्रपटासाठी तयार केलेल्या सर्व आठ गाण्यांना प्रसिद्ध गायिका अनुराधा पाैडवाल यांचा मुलगा आदित्य पाैडवाल यांनी संगीत दिले होेते. या गाण्यांमुळे व चित्रपटामुळे देवस्थानची महती महाराष्ट्रभर गेली.

नगर : श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थानच्यावतीने तयार करण्यात आलेल्या `महिमा आगडगाव के कालभैरव का` या चित्रपटासाठी तयार केलेल्या सर्व आठ गाण्यांना प्रसिद्ध गायिका अनुराधा पाैडवाल यांचा मुलगा आदित्य पाैडवाल यांनी संगीत दिले होेते. या गाण्यांमुळे व चित्रपटामुळे देवस्थानची महती महाराष्ट्रभर गेली. आज आदित्य पाैडवाल यांचे निधन झाल्याचे समजताच देवस्थानच्या विश्वस्तांनी शोक व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला.

देवस्थानाच्या गाण्यांच्या निर्मितीसाठी देवस्थानचे सर्व विश्वस्त पाैडवाल यांच्या घरी अनेकदा गेले. त्यावेळी आदित्य यांच्याशी कायम चर्चा व्हायची. गाणी कंपोज कसे होतात, कोणत्या गाण्यांना कोणते संगीत द्यायला हवे, चांगले संगीत, गाणी देवस्थानची महती वाढविणारे ठरते, असे ते सांगत. आदित्य यांनी त्यांच्याकडील विविध संगीताचे साहित्य दाखवून त्याची माहिती दिली होती. चित्रपटाच्या निर्मितीसाठी देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव त्रिंबक साळुंके, खजिनदार दीपक गुगळे, सल्लागार मुरलीधर कराळे तसेच विश्वस्त नितीन कराळे, संभाजी कराळे, दिलीप गायकवाड, तुलशीदास बोरुडे, गोरक्षनाथ जाधव, चंद्रकला खाडे, तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे आदींनी पाैडवाल यांच्याशी अनेकदा चर्चा केली. 

आदित्य पाैडवाल यांनी संगीतबद्ध केलेली सर्व आठही गाणी अनुराधा पाैडवाल, अनुप जलोटा, अजय-अतुल, कविता पाैडवाल, मोहंमत अजिज, उदित नारायण, सोनू निगम आदी दिग्गज गायकांनी गायलेली आहेत. ही गाणी यु-ट्यूबवरही मोठ्या प्रमाणात ऐकली जात आहेत. चित्रपटाच्या शुटिंगसाठी अनुराधा पाैडवाल, कविता पाैडवाल आगडगावला आल्या होत्या. त्यांनी मंदिर पाहून समाधान व्यक्त केले होते. आज आदित्य पाैडवाल यांच्या निधनाची बातमी समजताच गावातील लोकांनी पाैडवाल यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख