Addition of four corona patients in Sangamner | Sarkarnama

नको तेच झाले ! संगमनेरमध्ये चार कोरोना रुग्णाची भर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

निमोण येथील एका व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

नगर : संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे. दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे.

निमोण येथील त्या व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, 

आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून २६ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे तिघे बाधित आढळून आले. बाधीत आढळलेली ५७ वर्षीय महिला ही काल नाशिक येथे बाधीत आढळलेल्या रुग्णांची नातेवाईक असून, दुसरा ५२ वर्षीय व्यक्ती हा संगमनेर शहरातील रहमतनगर येथील रहिवासी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

सध्या, नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील असून, त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना तिकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्ती बाधित असल्याची माहिती डाॅ.गाडे यांनी दिली.

हेही वाचा...

श्रीरामपुरात बाजारपेठ पुन्हा उघडणार 

श्रीरामपूर : शहरातील बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यासाठी आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची येथील प्रशासकीय कार्यालयात बैठक झाली. पालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने दिवसाआड खुली करून गावगाडा रुळावर आणण्याचे नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव पालिकेने प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यावर बाजारपेठ दिवसाआड सुरू होणार आहे. प्रशासनाने आजपर्यंत कोरोनाला तालुक्‍यापासून दूर ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी समीर शेख उपस्थित होते. 

उपनगराध्यक्ष ससाणे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शहरातील बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली होती. थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी अनिल पवार यांना सूचना केल्या. पालिका प्रशासनाने शहरातील दुकाने दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु नियोजनाअभावी बाजारपेठेत गर्दी उसळली. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याने तहसीलदार पाटील यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा आदेश काढला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील काल (सोमवारी) येथे आले असता, बाजारपेठ पुन्हा खुली करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. 

बाजारपेठ खुली करण्याबाबत आज दुपारी बैठक झाली. प्रशासकीय नियमांचे पालन करून बाजारपेठ सुरू करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या. त्यानुसार शहरातील दुकाने लवकर सुरळीत होणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला आहे. पालिकेकडून नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य दिले जाईल. मास्क बांधलेल्या, तसेच एका वेळी फक्त पाच ग्राहकांनाच दुकानात प्रवेश द्यावा, आवश्‍यक खरेदीसाठीच बाहेर पडावे, व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आदिक यांनी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख