जामखेड : "जामखेड तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे सदस्य निवडून आले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे कामी मार्गे लवू," असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले .
जामखेड तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी कर्जत -जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, संजय वराट, रमेश आजबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार पवार म्हणाले, "जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यापैकी सात ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, तर उर्वरित 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यापैकी 33 ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना मिळाली.
असे एकूण मिळून 40 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्याचा फायदा तालुक्यातील विकास कामासाठी निश्चितपणे होईल.
प्रत्येक गावांमध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपला पुढाकार राहील. ग्रामसचिवालय, नळ पाणीपुरवठा योजना, पानंद रस्ते, शिव रस्ते हे प्रमुख्याने मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवलेले आणि पराभूत झालेल्यांना
बरोबर घ्यावं आणि गावाच्या विकासासाठी काम करावं. निश्चितपणे चांगलं काम उभं राहिल. गावचा विकास करणे साध्य होईल, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी वारे, राळेभात, गोलेकर, वराट,संजय काशीद, मंगेश आजबे, सुनील लोंढे, दादासाहेब सरनोबत यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नागेश गवळी यांनी केले.
Edited By - Murlidhar karale

