जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने - 2.5 crore counterfeit gold in District Co-operative Bank | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने

विलास कुलकर्णी
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राहुरी : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 पैकी तब्बल 134 कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने बनावट आढळले आहे. 57 कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे 50 लाख रुपयांची वसुली झाली.

बनावट सोने गहाण ठेवलेल्या 134 कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील सरव्यवस्थापक राजेंद्र शेळके यांच्या अधिपत्याखाली सोनगाव शाखेतील सोनेतारण दागिन्यांची सत्यता पडताळणी नुकतीच पूर्ण झाली. राहुरी येथे जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे प्रतिनिधी, पोलीस, कर्जदार यांच्यासमक्ष गहाण दागिन्यांची पिशवी उघडून बँकेने नियुक्त केलेल्या सुवर्णपारखी (सराफ) यांनी 191 कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली. त्यात 134 कर्जदारांचे सोने बनावट आढळले. 57 जणांनी कर्ज व व्याजाची रक्कम भरून, दागिने सोडवून घेतले. त्यांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी करण्यात आली नाही. कर्जदारांच्या अनुपस्थितीत पंचांसमक्ष दागिन्यांची तपासणी करण्यात आली.

सोनगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या काही व्यक्तींनी बँकेच्या सुवर्णपारखीशी हातमिळवणी करुन, अनेक ग्रामस्थांच्या नावावर बनावट सोने तारण ठेऊन, कर्ज उचलले आहे. काही ग्रामस्थांनी बँकेकडे तशी तक्रार केली आहे. दागिन्यांच्या सत्यता पडताळणीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सोनगाव-सात्रळ परिसरातील काही प्रतिष्ठित पसार झाले आहेत. 

वारंवार घोटाळे !

जिल्हा बँकेने स्ट्राँगरूम केलेल्या शाखांमध्ये सोनेतारण कर्ज देण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला. इतर बँकांपेक्षा कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज मिळू लागल्याने, कर्जदारांचा ओढा वाढला. मागील वर्षी श्रीरामपूर येथे टाऊन व शिवाजी रोड शाखांमध्ये बनावट सोनेतारण कर्जप्रकरणे झाल्याचे आढळले. त्यावेळी बँकेतर्फे संबंधित कर्जदार व सुवर्णपारखी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. सोनगाव शाखेत त्याची पुनरावृत्ती घडली. त्यामुळे, जिल्हा बँकेने सोनेतारण कर्ज प्रकरणे केलेल्या सर्व शाखांमध्ये गहाण सोन्याची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे.

चार-पाच दिवसांत गुन्हे दाखल होणार

सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्जाच्या 191 कर्जदारांच्या सोन्याची सत्यता पडताळणी झाली. 134 कर्जदारांचे सोने बनावट आढळले. 57 कर्जदारांनी थकित कर्ज भरून, सोने सोडविले. बनावट सोने आढळलेले 134 कर्जदार व सोनगाव शाखेतील सुवर्णपारखी यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसात गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हा सहकारी बॅंकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख