19 new patients in the district! 2-year-old Chimurdi, 80-year-old man overcomes corona | Sarkarnama

जिल्ह्यात नवीन 19 रुग्ण ! 2 वर्षाची चिमुरडी, 80 वर्षाच्या व्यक्तीची कोरोनावर मात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

आज दुपारी आलेल्या अहवालात 19 जण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या.

नगर : जिल्ह्यात आज 19 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा आलेख उंचावतच आहे. तथापि, कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. आज दोन वर्षाची चिमुरडी, तसेच 80 वर्षे वयाच्या एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे कोरोनातून सर्व वयोगटातील रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, हे दिसून आले.

आज दुपारी आलेल्या अहवालात 19 जण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. श्रीरामपूर येथील 48 वर्षीय पुरूष, पारनेर तालुक्यातील बाभूळवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, जामखेड तालु्क्यातील जायभाय वाडी येथील 32 वर्षीय व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली. ही व्यक्ती कल्याणवरून प्रवास करून आलेली होती. शेवगाव तालुक्यातीलही एका व्यक्तीला कोरोना असल्याचे आजच्या अहवालातून सिद्ध झाले. 

नगर शहरात वाढते रुग्ण

नगर शहरातील झारेकर गल्ली येथील 32 वर्षीय व्यक्ती, बागरोजा हडको येथील 32 वर्षीय व्यक्ती, तसेच सुडके मळा येथील 30 वर्षीय पुरूष व 28 वर्षीय महिला पाॅझिटिव्ह आढळून आले. तोफखाना येथील 6 वर्षीय चिमुरडी, सिद्धार्थनगर येथील 38 वर्षीय महिला बाधित आढलून आली आहे. भिंगार येथील 35 वर्षीय महिला बाधित आढळून आली असून, जवळील आलमगीर येथील एक महिला बाधित आढळली आहे. 

सध्या जिल्ह्यात 120 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 असून, आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 441 झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 307 झाली आहे. सकाळी 55 व्यक्तींचे अहवाल आले होते. ते सर्व निगेटिव्ह होते. दुपारच्या अहवालात मात्र 19 जण पाॅझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. 

दरम्यान, नगर शहरात सध्या संपूर्णपणे लाॅकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बहुतेक सर्वच भागात कोरोना रुग्ण आढळल्याने रोज सायंकाळी रस्ते सामसूम होत आहेत. उपनगरांमध्ये मात्र लोकांची ये-जा सुरूच असते. तेथीलही काही ठिकाण रुग्ण आढळून आले आहेत. लोकांनी कोणत्याही परिस्थिती अनावश्यकपणे बाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद केली असून, 14 दिवस कोणताही माल मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या आता कमी झाली आहे. असे असले, तरी बांधकामे जोमात सुरू असल्याने यासाठीच्या साहित्याची दुकाने अनेक ठिकाणी चालूच आहेत. अनेकांची गोडावून शहराबाहेर असल्याने ही वाहतूक जोरात सुरू आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख