आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर  - 19 crore sanctioned for roads through the efforts of MLA Ashutosh Kale | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर 

सतीश वैजापूरकर
बुधवार, 30 डिसेंबर 2020

रस्त्याची दुर्दशा झाल्याने येथे अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपण या कामास प्रधान्य दिले.

शिर्डी : गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्दशा झालेल्या 106 किलोमिटर लांबीच्या नगर-कोपरगाव राज्यमार्गाच्या सावळीविहिर ते कोपरगाव या अंतरातील साडेदहा किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे भाग्य उजळले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या मतदार संघातून जाणारा हा रस्ता असल्याने या कामासाठी 19 कोटीचा निधी मंजूर करून आणला. या कामाची निविदा देखील प्रसिध्द झाली आहे. 

याबाबत माहिती देताना आमदार काळे म्हणाले, की राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला सावळिविहीर ते कोपरगाव हा साडेदहा किलोमिटर लांबीचा रस्ता कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जातो. रस्त्याची दुर्दशा झाल्याने येथे अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपण या कामास प्रधान्य दिले. आता या कामाची निविदा प्रसिध्द झाली. सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन. एच. 752 जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी, नगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 160 मंजूर करण्यात आला. मात्र त्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, याबाबत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना साकडे घातले. या रस्त्यासाठी अंदाजे 19 कोटी 39 लाख 49 हजार 124 रुपये खर्च अपेक्षित असून, रस्ते दुरुस्ती कंपनीला आपली निविदा 27 जानेवारीपर्यंत सबंधित विभागाकडे दाखल करावी लागणार आहे. निविदा उघडल्यानंतर शासन नियमामुसार पात्र कंपनीला दुरुस्तीचे काम देण्यात येणार आहे. 

गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी 300 कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव व शिर्डी विमानतळ व पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव व कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी 105 कोटी रूपये खर्चाच्या प्रस्ताव ही महत्वाची कामे लवकरच मार्गी लागतील. येत्या नववर्षाची जनतेला दिलेली भेट असेल, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख