नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढताना दिसत आहेत. सरकारी आकडेवारी एखाद्या दिवशी कमी दिसते, तर दुसऱ्या दिवशी एकदम वाढलेली दिसून येते. प्राप्त अहवालानुसार आकडेवारी मिळत असली, तरी त्याची भयानकता मोठी आहे. कालच्या (ता. 2) सरकारी अहवालात आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 306 होती. ती आजच्या (ता. 3) अहवालात मृत्यूची संख्या तब्बल 318 झाली आहे. एकाच दिवसात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात आज ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६६ टक्के इतके झाले आहे.
आज नव्याने 66 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ४९१ इतकी झाली आहे. नव्याने बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३५, नगर ग्रामीण २, राहुरी ५, शेवगाव १, कोपरगाव ८, जामखेड १४, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या १९ हजार ९६१ असून, उपचार सुरू असलेले रूग्ण २ हजार ४९१ आहेत. तसेच एकूण रुग्ण संख्या 22 हजार 770 झाली आहे.
कोरोना बेडचा घोळ कायम
दरम्यान, सरकारच्या वेब पोर्टलवर बहुतेक रुग्णालयांंमध्ये कोरोना रुग्णांसाठी रिकाम्या बेडची आकडेवारी जाहीर केली जाते. प्रत्यक्षात संबंधित रुग्णालयात चाैकशी केली असता बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. रुग्णाची परिस्थिती पाहून रुग्ण दाखल करून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच आगावू रक्कम 30 ते 40 हजार घेतल्याशिवाय खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाला प्रवेश दिला जात नसून, पैसे भरण्यास टाळाटाळ झाल्यास बेड नसल्याचे सांगून वेळ मारून नेल्याच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे वेब पोर्टलवरील आकडेवारी व प्रत्यक्षातील रिकाम्या बेडच्या आकडेवारीत घोळ कायमच असल्याचे दिसून येत आहे.

