नगर : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्या (ता. 26) जिल्ह्यातील 11 पोलिसांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रम व पुरस्कार वितरण कार्यक्रम सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून होणार आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 11 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यात पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल गाडेकर, सहायक फौजदार काशिनाथ खराडे, सहायक फौजदार रवींद्र कुलकर्णी, सहायक फौजदार राजेंद्र सुपेकर, चालक सहायक फौजदार अर्जुन बडे, पोलिस हवालदार शैलेश उपासनी, पोलिस हवालदार मन्सूर सय्यद, पोलिस हवालदार कैलास सोनार, पोलिस कॉन्स्टेबल अजित पटारे यांचा समावेश आहे. उत्कृष्ट अपराधसिद्धीसाठी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना सात हजार रुपये, सी -नोट व प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे. हे बक्षीस पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
हेही वाचा..
अर्सेनिक गोळ्यांचे वाटप पूर्ण : मुश्रीफ
नगर : जिल्ह्यातील नागरिकांना अर्सेनिक गोळ्यांचे वाटप शंभर टक्के झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोरोनाच्या काळात नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढवावी, यासाठी अर्सेनिक गोळ्यांचे वाटप करावे, असे निर्देश आयुष मंत्रालयाने दिलेले होते. त्यानुसार राज्य सरकारने जिल्हा परिषदांना अर्सेनिक गोळ्या वाटपाचे नियोजन करण्याचे आदेश दिलेले होते.
जिल्ह्यातील एक हजार 318 ग्रामपंचायतींकडून सुमारे 38 लाख नागरिकांना गोळ्यांचे वाटप होणे गरजेचे असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्हा परिषदेने सुमारे 38 लाख अर्सेनिकच्या डब्यांचे वाटप जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात केले. त्यानंतर गटविकास अधिकारी कार्यालयाकडून त्यांचा पुरवठा प्रत्येक ग्रामपंचायतींना करण्यात आलेला आहे.
Edited By - Murlidhar Karale

