कर्डिले यांचे आरोप तनपुरेंनी खोडले ! बनावट डिझेल प्रकरणाशी संबंध नाही - Tanpure refutes the allegations! Not related to the fake diesel case | Politics Marathi News - Sarkarnama

कर्डिले यांचे आरोप तनपुरेंनी खोडले ! बनावट डिझेल प्रकरणाशी संबंध नाही

मुरलीधर कराळे
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

कोणी कितीही आरोप केले, तरीही मी त्यांकडे लक्ष देणार नाही. माझे विकास कामे सुरूच राहणार आहेत. या प्रकरणातील संबंधित आरोपी पकडलेला आहे. त्यामुळे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नगर : बनावट डिझेलप्रकरणाचे कनेक्शन राहुरीकडे असल्याचे सांगून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आरोप केले होते. त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर रोख होता. त्याला आज तनपुरे यांनी उत्तर दिले. हे आरोप खोडून काढत त्या प्रकरणाशी आपला संबंध नसून, हे आरोप चुकीचे आहेत, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

नगर जिल्ह्यात बनावट डिझेलचे प्रकरण गाजले. त्या प्रकरणाचे राहुरी कनेक्शन असल्याचे व या प्रकरणातील आरोपींना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे कर्डिले यांनी म्हटले होते. त्यामुळे या आरोपाचा रोख मंत्री तनपुरे यांच्यावर येत होता. तदनंतर राहुरी येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते शब्बीर देशमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला.

आज तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. कोणी कितीही आरोप केले, तरीही मी त्यांकडे लक्ष देणार नाही. माझे विकास कामे सुरूच राहणार आहेत. या प्रकरणातील संबंधित आरोपी पकडलेला आहे. त्यामुळे पोलिस पुढील तपास करीत आहेत. याबाबतचे कनेक्शन लवकरच उघड होईल. त्याचा निर्णय कोर्टात होईल, परंतु आरोप करणारांनी आरोप करीत बसण्यापेक्षा कामांकडे लक्ष द्यावे, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

शाळेत जाण्याची सक्ती नाही

शाळेबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक परिस्थिनुसार ते अवलंबून राहणार आहे. कोरोना रुग्ण संबंधत भागात असतील, तर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही, तरी चालेल. आॅनलाईन शिक्षण मात्र शाळांनी सुरू ठेवावे. विद्यार्थ्यांनीही अशा अभ्यासक्रमातून शिक्षण घ्यावे, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

ते काम मागील सरकारचे

दरम्यान, विजेच्या प्रश्नाविषयी बोलताना तनपुरे यांनी मागील सरकारमुळे विजेचा प्रश्न रखडलेला आहे. विज जोड देण्याचे कामही मागील सरकारमुळेच रखडले आहे. परंतु यापुढे असे जोड तातडीने दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. वीजसुविधेबाबत मागील सरकारने विशेष काहीच कामे केली नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख