संग्राम जगतापांचे महापाैर निवडीबाबत मोठे विधान : आघाडी पाळू... पण? - Sangram Jagtap's big statement regarding Mahapair election: Let's follow the lead ... but? | Politics Marathi News - Sarkarnama

संग्राम जगतापांचे महापाैर निवडीबाबत मोठे विधान : आघाडी पाळू... पण?

मुरलीधर कराळे
शनिवार, 5 जून 2021

महापाैरांची मुदत संपत आली असली, तरी अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. राज्यात महाविकास आघाडी असल्याने स्थानिक पातळीवरही तसा प्रयत्न राहिल. याबाबत सर्व नगरसेवकांशी बोलून निर्णय घेतला जाईल.

नगर : नगर शहरात महापाैरपदाच्या निवडणुकीची चर्चा जोरात सुरू असून, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे महाविकास आघाडीचे पालण करणार की काही वेगळी भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. खुद्द जगताप यांनी मात्र `सरकारनामा`शी बोलताना आपली भूमिका मांडली. नगरमध्येही राज्याप्रमाणेच महाआघाडी राहील. याबाबत सर्व नगरसेवकांशी बोलून निर्णय घेऊ, आणि पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करू, असे ते म्हणाले. (Sangram Jagtap's big statement regarding Mahapair election: Let's follow the lead ... but?)

मागील वेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपला मदत केली होती. परंतु या वेळी परिस्थिती बदलली आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस हे तिनही पक्ष एकत्रित आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरही याचा कित्ता गिरविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना आमदार जगताप म्हणाले, की प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते. राज्याप्रमाणेच नगरमध्येही तिनही पक्षाकडून आघाडीचा धर्म पाळला जाईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. अद्याप निवडणूकच जाहीर झाली नसल्याने विशेष चर्चाही झाली नाही. परंतु लवकरच संबंधितांशी चर्चा होऊन वरिष्ठ आदेश देतील, त्याप्रमाणे नगरमध्ये पाऊल उचलले जाईल.

महापाैरपदासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस इच्छुक आहे का? याबाबत बोलताना आमदार जगताप म्हणाले, होय, नक्कीच. प्रत्येक पक्षाने ती इच्छा व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. राष्ट्रवादीकडेही आरक्षणानुसार महापाैरपदासाठी एक नगरसेवक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा महापाैर होण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. असे असले, तरी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली जाईल. त्यांचे मते जाणून घेतली जातील. त्यानंतर तिनही पक्षांचे वरिष्ठ याबाबत निर्णय देतील. त्याप्रमाणे निवडणुकीत योग्य ती भूमिका घेतली जाईल.

शिवसेनेच्या नगरसेवकांची तुमच्याबाबत नाराजी आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, असे काहीच नाही. वैयक्तिक माझ्याबाबतीत कोणताही नगरसेवक नाराज असण्याचे कारण नाही. पक्ष कोणताही असो, त्यांच्या प्रभागात कामे करण्यास आपण कोणताही दुजाभाव केला नाही. त्यामुळे शिवसेनाच काय इतर पक्षातील कोणीही नगरसेवक माझ्यावर नाराज नाही. महापाैर निवडणुकीच्या बाबतीत संबंधित पक्षाचे प्रमुख किंवा वरिष्ठ आदेश देतील, त्याप्रमाणे संबंधितांना भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका आमचीही असेल.

दरम्यान, सध्या भाजपचा महापाैर आहे. मागील निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेनेला दूर ठेवत भाजपचा महापाैर केला होता. या वेळी मात्र भाजपकडे आरक्षणानुसार महापाैरपदासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे भाजपचे नगरसेवक कोणाला साथ देतील, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. राज्यात भाजप विरोधी बाकावर आहे. त्यामुळे भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. तसेच शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असल्याने शिवसेनाही या पदासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांवरच नगरचा महापाैर कोणत्या पक्षाचा होणार, हे स्पष्ट होत आहे.

 

हेही वाचा..

शिवसेनेतील अवमेळाचा फायदा राष्ट्रवादीला शक्य

हेही वाचा..

महापाैर निवडणुकीत खासदार सुजय विखेंनीही घातले लक्ष

हेही वाचा...

शरद पवारांशी आमदार जगताप यांची काय झाली चर्चा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख