कर्जत : आमदार रोहित पवार यांनी काल दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या वेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीस मान्यता देण्याची मागणी केली. तसेच अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करता यावेत, यासाठी मिरजगाव परिसरात विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणीही या वेळी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यापासून या रस्त्यांच्या कामासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी काल त्यांनी दिल्लीत गडकरी यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन रस्त्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन दिले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने व अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेकदा अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी नगर, पुणे, बारामती अशा लांबच्या ठिकाणी घेऊन जावे लागते. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने जखमींच्या जीवितास धोका निर्माण होतो. या सर्वांचा विचार करून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात यावे किंवा त्यासाठी राज्य सरकार किंवा एखाद्या संस्थेला ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाशी संबंधित रस्त्यांच्या विकासासाठी लोकांच्या हिताचा विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि यातील काही रस्त्यांसाठी येत्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली जाईल, असा विश्वास गडकरी यांनी केल्याचे समजते.दरम्यान, मतदारसंघाच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू असून, खासदार डॉ. सुजय विखे हेही लोकांच्या हितासाठी पाठपुरावा करत असतील आणि यापुढेही करतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
सध्या या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, मिरजगाव, घोगरगाव, माही जळगाव या शहरी भागातील रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी लवकरात लवकर कंत्राटदार नेमून काम सुरु करावे, अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली.
या कामासाठी अडथळा असलेला भूसंपादनाचा आणि इतर प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावले आणि याबाबतचा अंतिम प्रस्ताव आपल्या विभागाकडे देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी गडकरी यांना सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत शहरी भागातील बाह्यवळण मार्गाकडेही लक्ष दिले जाते. त्याप्रमाणे मतदारसंघातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
Edited By - Murlidhar Karale

